T20 World Cup 2022: भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी उडवला धुव्वा, उपांत्य फेरीत इंग्लंडसोबत भिडणार

WhatsApp Group

India vs Zimbabwe: मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. T20 विश्वचषक 2022 च्या 42 व्या सामन्यात टीम इंडियाने 71 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 187 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 115 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून सूर्यकुमार यादवने संस्मरणीय खेळी खेळली. तर रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी दाखवली. शमी आणि हार्दिक पांड्याने 2-2 विकेट घेतल्या.

टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 17.2 षटकात 115 धावांवर सर्वबाद झाला. झिम्बाब्वेकडून रायन बर्लेने सर्वाधिक 35 धावा केल्या. त्याने 22 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकला. सिकंदर रझाने 24 चेंडूत 34 धावा केल्या. त्याने 3 चौकार मारले. कर्णधार क्रेग इर्विनलाही फार काही करता आले नाही. तो 15 चेंडूत 13 धावा काढून बाद झाला. सलामीवीर वेस्ली माधवेरे खातेही उघडू शकला नाही. त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केले. चकबवाही शून्यावर बाद झाला.

टीम इंडियासाठी रविचंद्रन अश्विनने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 22 धावा देत 3 बळी घेतले. मोहम्मद शमीने 2 षटकात 14 धावा देत 2 बळी घेतले. हार्दिक पांड्याने 3 षटकात 16 धावा देत 2 बळी घेतले. अर्शदीप सिंगने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 2 षटकात 9 धावा देत 1 विकेट घेतली. भुवनेश्वर कुमारनेही 3 षटकात 11 धावा देत 1 विकेट घेतली.

प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. यादरम्यान सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी केली. त्याने 25 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. सूर्याने या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. याआधी सलामीवीर केएल राहुलनेही अर्धशतक झळकावले. त्याने 35 चेंडूत 51 धावा केल्या. त्याच्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. विराट कोहली 26 धावा करून बाद झाला, त्याने 2 चौकार मारले. रोहित शर्मा 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक पांड्याने 18 चेंडूत 18 धावा केल्या.