विराट कोहलीचे शतक (113 धावा), रोहित शर्माच्या 83 धावा आणि शुभमन गिलच्या 70 धावांच्या जोरावर भारतीय संघाने वर्ष 2023 ची सुरुवात एकदिवसीय क्रिकेटमध्ये विजयाने केली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने मंगळवारी श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य ठेवले होते, दासुन शनाकाच्या शतकानंतरही श्रीलंकेचा संघ 308 धावाच करू शकला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारीला होणार आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांमध्ये 143 धावांची सलामीची भागीदारी झाली. शुभमन गिल 60 चेंडूत 70 धावांची (11 चौकार) खेळी केल्यानंतर दासून शनाकाने एलबीडब्ल्यू आऊट झाला. कर्णधार रोहित शर्माने 67 चेंडूत 83 धावांची (नऊ चौकार, तीन षटकार) खेळी केली. श्रेयस अय्यरने 28 धावांची (23 चेंडू) खेळी खेळली. केएल राहुल 39 धावा (29 चेंडू), हार्दिक पंड्या 14 धावा आणि अक्षर पटेल 09 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील सलग दुसरे शतक झळकावले. कोहलीने वनडे कारकिर्दीतील 45 वे शतक झळकावले. त्याने 87 चेंडूत 113 धावांची (12 चौकार, एक षटकार) खेळी खेळली. भारतीय संघाने 50 षटकांत सात विकेट गमावून 373 धावा केल्या.
That’s that from the 1st ODI.#TeamIndia win by 67 runs and take a 1-0 lead in the series.
Scorecard – https://t.co/262rcUdafb #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/KVRiLOf2uf
— BCCI (@BCCI) January 10, 2023
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने सलामीवीर अविष्का फर्नांडोची (05 धावा) विकेट लवकर गमावली. कुसल मेंडिसला खातेही उघडता आले नाही. दोन्ही विकेट मोहम्मद सिराजच्या नावावर होत्या. 23 धावांची इनिंग खेळून चरिथ अस्लंका उमरान मलिकचा बळी ठरला. तीन झटपट विकेट पडल्यानंतर पथुम निसांका आणि धनंजय डी सिल्वा यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मोहम्मद शमीने ही भागीदारी तोडली. धनंजय डी सिल्वा 40 चेंडूत 47 धावांची खेळी करून बाद झाला.
वनिंदू हसरंगा (16 धावा), वेलगे (0 धावा) आणि चमिका करुणारत्ने (14 धावा) हेही लवकर बाद झाले. चहलने हसरंगाची विकेट घेतली, तर उमरान मलिकने वेलेजला आपला बळी बनवले. हार्दिक पांड्याला चमिका करुणारत्नेची विकेट मिळाली. श्रीलंकेने 206 धावांच्या स्कोअरवर आठवी विकेट गमावली होती, पण त्यानंतर दासून शनाकाने शानदार फलंदाजी केली. त्याने कसून रजिथासोबत नाबाद शतकी भागीदारी केली. दासुन शनाकाने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले आणि 88 चेंडूत (12 चौकार, तीन षटकार) 108 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला, परंतु तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. श्रीलंकेचा संघ 50 षटकांत आठ गडी गमावून 308 धावाच करू शकला. शनाकाने रजिथासोबत 100 धावांची नाबाद भागीदारी केली. नऊ धावा केल्यानंतर रजिथा नाबाद राहिला. भारताकडून उमरान मलिकने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर मोहम्मद सिराजला दोन यश मिळाले.