IND Vs SA: भारताने दक्षिण आफ्रिकेचा 106 धावांनी केला पराभव, कुलदीप यादवने घेतल्या 5 विकेट

WhatsApp Group

जोहान्सबर्ग येथे गुरुवारी रात्री खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा 106 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. आता रविवारपासून (17 डिसेंबर) उभय संघांमधील 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 201 धावा केल्या. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 100 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या प्रोटीज संघाला 13.5 षटकांत सर्व 10 गडी गमावून केवळ 95 धावा करता आल्या आणि सामना गमवावा लागला. संघाकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 35 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने 5 बळी घेतले.

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली. दुस-याच षटकात सलामीवीर मॅथ्यू ब्रिट्झके (4) बाद झाला. यानंतर 23 धावांवर रीझा हेंड्रिक्सच्या (8) रूपाने संघाला दुसरा धक्का बसला. काही वेळाने हेनरिक क्लासेन (5)ही बाद झाला. यानंतर कर्णधार एडन मार्कराम (25), डोनोव्हन फरेरा (12), अँडिले फेहलुकवायो (0) आणि केशव महाराज (1) लवकर बाद झाल्याने संघाचे नुकसान झाले.

सूर्यकुमारने चौथे टी-20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. आघाडीची फळी ढासळल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमारने संघासाठी शानदार खेळी केली. 181.82 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने 55 चेंडूत 100 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 8 षटकार आले. सूर्यकुमारचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील हे चौथे शतक होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे हे त्याचे या फॉरमॅटमधील पहिले शतक ठरले.

यशस्‍वीचे टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये तिसरे अर्धशतक
यशस्वी जैस्वालने तुफानी फलंदाजी केली. गुरुवारी, त्याने त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याच्या डावात त्याने 41 चेंडूत 146.34 च्या स्ट्राईक रेटने 60 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकारही मारले. सुरुवातीला तो काहीशा दडपणाखाली दिसला, पण खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर त्याने आक्रमक फटके खेळले.