पहिल्या टी२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर मिळवला रोमहर्षक विजय!

WhatsApp Group

जयपूर – 3 सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दोन चेंडू आणि पाच गडी शिल्लक असतानाच लक्ष्य गाठले. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 62 तर कर्णधार रोहित शर्माने 48 धावांची खेळी केली. भारताकडून रवीचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतलेत. तर दीपक चहर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

भारताकडून 165 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी 50 धावांची भागीदारी केली. सँटनरने लोकेश राहुलला 15 धावांवर बाद केले. नंतर रोहित आणि सूर्यकुमार यांनी 59 धावांची भागीदारी केली. ट्रेंट बोल्टने रोहित शर्माला 48 धावांवर माघारी धाडले. रोहितने 36 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार लगावत 48 धावा केल्या.


दुसरीकडे सूर्यकुमार यादवने अर्धशतक करत भारताला विजयाच्या जवळ आणले. सुर्याने आपल्या वादळी खेळीत 40 चेंडूमध्ये 6 चौकार आणि 3 षटकार लगावले. सूर्यकुमारला 62 धावांवर ट्रेंट बोल्टने बाद केले. अखेरच्या षटकात रिषभ पंतने दमदार चौकार लगावत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारने केलेल्या या दमदार खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या टी20 मालिकेतील दुसरा सामना 19 नोव्हेंबरवा JSCA इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची येथ खेळला जाणार आहे. तर तिसरा आणि अखेरचा सामना 21 नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. हे दोन्ही सामने संध्याकाळी 7 वाजता खेळवण्यात येतील.