IND vs SL: भारताचा श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी
India VS Sri Lanka: भारतीय क्रिकेट संघाने कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने भारताला 216 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 43.2 षटकांतच लक्ष्य गाठले. भारताकडून केएल राहुलने नाबाद 64 धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाला संकटाशी झुंज देत विजय मिळवता आला.
दुसऱ्या वनडेत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान नुवानिडू फर्नांडोने अर्धशतक झळकावले. त्याने 63 चेंडूंचा सामना करत 50 धावा केल्या. त्याच्या खेळीत 6 चौकारांचा समावेश होता. कुसल मेंडिसने 34 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 34 धावा केल्या. कर्णधार दासुन शनाका अवघ्या 2 धावा करून बाद झाला. सलामीवीर खेळाडू अविष्का फर्नांडोने 20 धावांचे योगदान दिले. त्याने 17 चेंडूत 4 धावा केल्या. संघाने 39.4 षटकांत सर्वबाद 215 धावा केल्या.
View this post on Instagram
श्रीलंकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियासाठी शुभमन गिल आणि रोहित शर्मा सलामीला आले. यादरम्यान रोहित 17 धावा करून बाद झाला. त्याने 21 चेंडूंचा सामना करत 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. शुभमन 12 चेंडूत 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 5 चौकार मारले. विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही. तो अवघ्या 4 धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यरने 33 चेंडूत 28 धावा केल्या.
हार्दिक पांड्याने राहुलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. 53 चेंडूत 36 धावा करून तो बाद झाला. त्याने 4 चौकार मारले. अक्षर पटेलने 21 चेंडूत 21 धावा केल्या. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. राहुलने भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची खेळी खेळली. त्याने 103 चेंडूंचा सामना करत नाबाद 64 धावा केल्या. राहुलने या सामन्यात 6 चौकार मारले. टीम इंडियाची टॉप बॅटिंग ऑर्डर खराब झाली होती, त्यानंतर राहुलने आघाडी घेतली आणि विजय मिळवला. कुलदीप यादव 10 चेंडूत 10 धावा करत नाबाद राहिला. त्याने 2 चौकारही मारले.