ICC ODI Rankings: आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारताने पाकिस्तानला टाकलं मागे

WhatsApp Group

मंगळवारी ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकले आहे. इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून विजय मिळवल्यानंतर भारताने आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी भारत 105 गुणांसह चौथ्या स्थानावर होता, परंतु या विजयाने आता 108 गुण झाले आहेत. पाकिस्तान आता 106 गुणांसह चौथ्या स्थानावर आला आहे.

न्यूझीलंड 126 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंड 122 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या विजयाचे नायक गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी होते, त्यांनी अनुक्रमे सहा आणि तीन विकेट घेतल्या, तर रोहित शर्माने फलंदाजीत कमाल केली. इंग्लंडचा संघ 110 धावांत गारद झाला.

रोहित शर्माने 58 चेंडूत 78 धावा करत संघाला 10 गडी राखून विजय मिळवून दिला. रोहितने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नियमित कर्णधारपद स्वीकारल्यापासून तो आतापर्यंत चांगला खेळ दाखवत आहे. याशिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या 14 पैकी फक्त एकच सामना भारताने गमावला आहे. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर भारत आता आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर घसरला आहे.

भारताला सलग 5 सामने खेळायचे असल्याने पाकिस्तानला खूप मागे टाकण्याची संधी आहे. यातील दोन सामने इंग्लंडविरुद्ध तर तीन एकदिवसीय सामने वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचा संघ काही काळानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. अशा स्थितीत सध्याच्या घडीला एकदिवसीय क्रमवारीत भारताला मागे टाकणे पाकिस्तानसाठी सोपे नसेल.