IND vs WI: टीम इंडियाने दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजचा 2 विकेटने केला पराभव, अक्षर पटेल चमकला

WhatsApp Group

IND vs WI: एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवत टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. अक्षर पटेलने चमकदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याने 64 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी अर्धशतके झळकावली. शार्दुल ठाकूरने गोलंदाजीत अप्रतिम 3 बळी घेतले.

भारतीय संघाकडून शिखर धवन आणि शुभमन गिल सलामीला आले. यादरम्यान धवन अवघ्या 13 धावा करून बाद झाला. तर शुभमनने 49 चेंडूत 43 धावा केल्या. त्याच्या खेळीत 5 चौकारांचाही समावेश होता. श्रेयस अय्यरने शानदार कामगिरी करताना अर्धशतक झळकावले. त्याने 71 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 63 धावा केल्या. सूर्यकुमार यादव 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

संजू सॅमसनने वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने 51 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. दीपक हुडाने 36 चेंडूत 33 धावा केल्या. त्याच्या खेळीत दोन चौकारांचा समावेश होता. शार्दुल ठाकूर अवघ्या 3 धावा करून बाद झाला. आवेश खानने 10 धावांचे योगदान दिले. त्याने 2 चौकारही मारले. अक्षर पटेलने या सामन्यात दमदार कामगिरी करत भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अक्षरने 35 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. भारताने हे लक्ष्य 49.4 षटकात पूर्ण केले.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 50 षटकांत 6 गडी गमावून 311 धावा केल्या. यादरम्यान शाई होपने शतक झळकावले. त्याने 135 चेंडूत 115 धावा केल्या. होपच्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर निकोलस पूरनने 77 चेंडूत 74 धावा केल्या. पूरनने 6 षटकार आणि 1 चौकार लगावला. मेयर्सने 39 आणि ब्रुक्सने 35 धावांचे योगदान दिले. पॉवेल 13 धावा काढून बाद झाला.

यादरम्यान शार्दुल ठाकूरने टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने 7 षटकात 54 धावा देत 3 बळी घेतले. तर दीपक हुडाने 9 षटकात 42 धावा देत एक विकेट घेतली. अक्षर पटेलने 9 षटकात 40 धावा देत एक विकेट घेतली. युझवेंद्र चहलनेही एक विकेट घेतली. आवेश खान आणि मोहम्मद सिराज यांना एकही यश मिळाले नाही. सिराजने 10 षटकात 47 धावा दिल्या.