
IND vs WI: दुखापतीमुळे विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. आज होणाऱ्या दुसऱ्या वनडेत तो खेळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार आहे. या दौऱ्यात संघाला 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ आधीच जाहीर झाला आहे. शिखर धवनला कर्णधार बनवण्यात आले आहे. पण टी-20 मालिका महत्त्वाची आहे कारण या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना वेस्ट इंडिजकडून विश्रांती दिली जाऊ शकते.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, निवडकर्ते अजूनही विराट कोहलीला टी-20 विश्वचषक संघाचा महत्त्वाचा भाग मानत आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी त्याला दुखापत झाली होती. त्याने आयपीएल 2022 मध्येही चांगली गोलंदाजी केली होती. अशा स्थितीत त्याची संघात निवड होण्याची शक्यता आहे.
मांडीला झालेल्या दुखापतीमुळे विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत उतरू शकलेला नाही. अशा परिस्थितीत त्याची दुखापत गंभीर होऊ नये, त्यासाठी त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या 2 टी-20 सामन्यात त्याला केवळ 11च धावाच करता आल्या. याशिवाय आयपीएलच्या 15 व्या मोसमातही त्याची कामगिरी चांगली नव्हती.
दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला देखील विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी संघाला आणखी काही मालिका खेळायच्या आहेत. याआधी बुमराहला फ्रेश राहण्यासाठी विश्रांती देण्यात येईल. वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका 29 जुलैपासून सुरू होणार असून ती 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.