IND vs SL: भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी केला पराभव, मिळवला वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय

WhatsApp Group

तिरुवनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला. टीम इंडियाने तिसरी वनडे 317 धावांनी जिंकली. यासह भारताच्या नावावर आता वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून विराट कोहलीच्या नाबाद 166 आणि शुभमन गिलच्या 116 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 390 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ अवघ्या 73 धावांत गारद झाला. मात्र, श्रीलंकेच्या केवळ 9 विकेट पडल्या, कारण त्यांचा एक खेळाडू जखमी झाला, त्यामुळे संघ ऑलआऊट मानला गेला. एकदिवसीय क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी न्यूझीलंडने 2008 मध्ये आयर्लंडविरुद्ध 290 धावांनी विजय मिळवला होता.

या सामन्यात श्रीलंकेचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले यावरून भारताच्या घातक गोलंदाजीचा अंदाज लावता येतो. तिरुवनंतपुरममध्ये प्रथम टीम इंडियाने डोंगराएवढी धावसंख्या उभारली आणि त्यानंतर मोहम्मद सिराजने आपल्या घातक गोलंदाजीमुळे श्रीलंकेला गुडघे टेकण्यास भाग पाडले. सिराजने 10 षटकांत एका मेडनसह 32 धावांत चार बळी घेतले. तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना 2-2 यश मिळाले. हेही वाचा – विराटने झळकावले 74 वे शतक, सचिन तेंडुलकरचा आणखी एक मोठा विक्रम

श्रीलंकेकडून सलामीवीर नुवानिडू फर्नांडोने सर्वाधिक 19 धावा केल्या. तर कर्णधार दासुन शनाकाने 11 आणि कसून राजिताने नाबाद 13 धावा केल्या. याशिवाय अविष्का फर्नांडो 01, कुसल मेंडिस 04, चरित असलंका 01, वानिंदू हसरंगा 01 आणि चमिका करुणारत्ने 01 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले.