
IND vs SA 3rd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना भारताने आफ्रिकेसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने दिलेले लक्ष्य पार करताना आफ्रिकेचा संघ 19.1 षटकांत 131 धावांवर सर्वबाद झाला. भारताने या सामन्यात 48 धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह मालिकेतील पिछाडी 1-2 अशी कमी केली आहे.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताकडून ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची सुरुवात केली. ऋतुराज गायकवाडने आक्रमक खेळीची सुरुवात केली, त्याने पॉवरप्लेमध्ये 2 षटकार ठोकले. दोन्ही फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 57 धावा केल्या. भारताला पहिला धक्का गायकवाडच्या रूपाने बसला, तो 57 धावा करून झेलबाद झाला. श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र अय्यर मोठी खेळी खेळू शकला नाही तो 14 धावा करून झेलबाद झाला. इशान किशनने आपली चांगली कामगिरी सुरू ठेवत तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. 35 चेंडूत 54 धावा करून प्रॅटोरियसने त्याला झेलबाद केले.
#TeamIndia win the 3rd T20I by 48 runs and keep the series alive.
Scorecard – https://t.co/mcqjkCj3Jg #INDvSA @Paytm pic.twitter.com/ZSDSbGgaEE
— BCCI (@BCCI) June 14, 2022
कर्णधार ऋषभ पंतला या सामन्यातही चांगली कामगिरी करता आली नाही. खराब शॉट खेळून तो 6 धावा काढून बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकही 6 पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात चांगले फटके मारले. सुरुवातीला संघर्ष केल्यानंतर पंड्याने शेवटच्या 2 षटकांत धावांचा वेग वाढवला. पांड्याने 21 चेंडूत 31 धावा केल्या, या खेळीत त्याने 4 चौकार मारले. अक्षर पटेल नाबाद राहिला आणि हार्दिकने 2 चेंडूत 5 धावा केल्या. भारताने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 179 धावा केल्या होत्या.
आफ्रिकेकडून फलंदाजी करताना कर्णधार टेंबा बावुमा आणि रेझा हेंड्रिक्स यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात केली, या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 23 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलच्या षटकात भारताला पहिले यश मिळाले. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टेंबा बावुमा 8 धावांवर झेलबाद झाला. पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर रेझा हेंड्रिक्सच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का बसला. हर्षल पटेलच्या चेंडूवर त्याला युझवेंद्र चहलने झेलबाद केले. हेंड्रिक्सने 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 23 धावा केल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेला रस्सी डुसेनच्या रूपाने तिसरा झटका बसला. तो फक्त 1 धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. लागोपाठ विकेट्सनंतर प्रेटोरियस आणि क्लासेन यांनी थोडा वेळ डाव सांभाळला पण चहलने ही भागीदारी पुन्हा एकदा मोडून काढत दक्षिण आफ्रिकेचा डाव दडपणाखाली आणला. प्रेटोरियस 20 धावा करत बाद झाला. डेव्हिड मिलर 3 आणि क्लासेन 29 धावांवर बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव पूर्णपणे डगमगला. दक्षिण आफ्रिकेने लागोपाठ विकेट गमावल्या आणि शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तबरेझ शम्सीच्या विकेटसह सर्व आऊट झाले. 131 धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने 48 धावांनी सामना गमावला. 48 धावांनी हा सामना जिंकून भारताने मालिकेती आव्हान जिवंत ठेवले आहे.