IND vs PAK: स्मृती मंधानाच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 8 विकेट्सने केला पराभव

WhatsApp Group

IND vs PAK: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत  पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडले. स्मृती मंधाना हिने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, तिने 42 चेंडूत 8 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 63 धावांची नाबाद खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर 100 धावांचे लक्ष्य ठेवले होते, टीम इंडियाने ही धावसंख्या 11.4 षटकात पूर्ण केली.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. पावसामुळे सामना 18 षटकांचा करण्यात आला, त्यानंतर पाकिस्तानी संघ भारतीय गोलंदाजांसमोर पत्त्यासारखा कोसळला. पाकिस्तानने 18 षटकात 99 धावा केल्या आणि संपूर्ण संघ बाद झाला. प्रत्युत्तरात भारताने 12व्या षटकात केवळ दोन गडी गमावून विजय मिळवला.

भारताकडून फलंदाजी करताना स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी टीमला जबरदस्त सुरुवात करून दिली. शेफाली वर्मा 9 चेंडूत 16 धावा करून बाद झाली, यादरम्यान तिने शानदार षटकारही लगावला. शेफाली आणि स्मृती यांच्यात अवघ्या 35 चेंडूत 64 धावांची भागीदारी झाली. स्मृती मंधानाने अवघ्या 42 चेंडूत 63 धावांची जलद खेळी केली. स्मृतीने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. बऱ्याच दिवसांपासून मोठ्या इनिंगची वाट पाहणाऱ्या स्मृती मंधानाने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा घाम काढला आणि संघाला विजय मिळवून दिला.

या मोठ्या विजयासह टीम इंडिया अ गटात पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारताचे दोन गुण आहेत, आणि भारताचा नेट-रन रेटही खूप जास्त आहे. तर पाकिस्तानने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले असून ते पॉईंट टेबलमध्ये तळाशी आहेत.