
Asia Cup 2022: आशिया चषक 2022च्या शेड्यूलची सर्व क्रिकेट चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत चाहत्यांना पुन्हा एकदा भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना पाहायला मिळेल. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे आहे.
ही स्पर्धा टी-29 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. आशिया चषक 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र, या स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. श्रीलंकन मीडियानुसार, आशिया चषक सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायला मिळू शकतो. 28 ऑगस्ट रोजी रविवार आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलसह ब्रॉडकास्टरला मॅचमध्ये जास्तीत जास्त टीआरपी हवा आहे. त्यामुळेच या मोठ्या सामन्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे.
आशिया चषकासाठी टीम इंडिया, यजमान श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. याशिवाय यूएई, नेपाळ, ओमान, हाँगकाँग आणि इतर संघांदरम्यान पात्रता फेरी खेळली जाईल. आशिया चषक 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत आयोजित केला जाणार आहे. टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असून पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझमकडे आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांशी भिडले त्यावेळी पाकिस्तानने भारतावर 10 गडी राखून विजय मिळवला होता.