टीम इंडियाच्या स्टार फलंदाजांपैकी एक असलेला सलामीवीर शुभमन गिलने आणखी एक शतक झळकावले आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात शुभमन गिलने शतक झळकावून भारतीय संघाचा डाव मजबूत करण्याचे काम केले. आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह शुभमन गिल डावाची सलामी देण्यासाठी आला. रोहित शर्मा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला, पण शुभमन गिलने संघाला संभाळले. माजी कर्णधार विराट कोहलीही बाद झाल्याने भारताला मोठा धक्का बसला. विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, पण या सामन्यात तो लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहित शर्माने 38 चेंडूत 34 धावांची खेळी केली तर विराट कोहली 10 चेंडूत केवळ 8 धावा करू शकला. एका बाजूने विकेट पडत होत्या, पण शुभमन गिलने हिंमत हारली नाही आणि शानदार फलंदाजी केली. शुभमन गिलचे हे वनडेतले तिसरे शतक आहे. याशिवाय त्याने कसोटीतही शतक झळकावले आहे.
शुभमन गिल नुकताच आपला 19 वा एकदिवसीय सामना खेळत आहे, पण या छोट्याशा कार्यकाळात शुभमन गिलने अप्रतिम फलंदाजी करून सर्वांनाच चकित केले आहे. शुभमन गिलने त्याच्या पहिल्या 19 सामन्यांमध्ये एक हजाराच्या जवळपास धावा केल्या आहेत, ज्या आतापर्यंत भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणत्याही खेळाडूने केल्या नाहीत. शुभमन गिलने याआधी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक झळकावले होते. शुभमनच्या या खेळीची खास गोष्ट म्हणजे त्याने केवळ 87 चेंडूत शतक झळकावले. त्याचा स्ट्राईक रेटही खूप चांगला आहे. गिलने 30व्या षटकातच शतक पूर्ण केले. यादरम्यान शुभमन गिलने 15 चौकार आणि 2 षटकार मारले.
Back-to-back ODI tons for Shubman Gill 👏#INDvNZ | 📝: https://t.co/raJtMjMaEn pic.twitter.com/yXkSO6lYX6
— ICC (@ICC) January 18, 2023
न्यूझीलंडचा संघ : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, हेन्री शिपले, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर
भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी