IND vs NZ: ODI नंतर T20 मध्ये शुभमन गिलचे तुफान, 54 चेंडूत ठोकले शतक

WhatsApp Group

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील आज निर्णायक सामना आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आज जो जिंकेल, मालिका त्याच्या नावावर होईल. नाणेफेक जिंकून या सामन्यात शुभमन गिलने दमदार शतक ठोकलं आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्ध त्याने कारकिर्दीतील पहिले एकदिवसीय द्विशतक झळकावले. यानंतर टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने कारकिर्दीतील पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतकही ठोकले आहे. या शानदार खेळीत त्याने 54 चेंडूत शतकाचा टप्पा गाठला. आपले शतक पूर्ण करताना गिलने आपल्या डावात 10 चौकार आणि 5 षटकार मारले.

न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा गिल सातवा भारतीय ठरला. सुरेश रैना, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, केएल राहुल आणि विराट कोहली हे इतर भारतीय फलंदाज आहेत ज्यांनी शुभमनच्या आधी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक केले आहे. रोहितच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके आहेत, ज्याने 4 शतके झळकावली आहेत. सूर्याने 3 तर केएल राहुलने 2 शतके झळकावली आहेत आणि उर्वरित फलंदाजांनी 1-1 शतके झळकावली आहेत.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलने ऐतिहासिक खेळी केली. खेळाच्या सर्वात लहान स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात मोठी खेळी करणारा तो भारतीय खेळाडू ठरला. या खेळीत त्याने 63 चेंडूंचा सामना करत नाबाद 126 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर त्याने टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विराट कोहलीचा विक्रम मोडला. आशिया चषक 2022 मध्ये कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद 122 धावांची खेळी केली होती. कोहलीचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक होते.

शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने चार गडी गमावून 234 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील भारतीय संघाची ही पाचवी सर्वोच्च धावसंख्या आहे. गिलच्या 126 धावांनंतर राहुल त्रिपाठीने या सामन्यात दुसरी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 22 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 44 धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने 17 चेंडूत 30 तर सूर्याने 13 चेंडूत 24 धावा केल्या.