IND vs IRE 2nd T20 : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात भारताचा 4 धावांनी विजय, आयर्लंडची झुंज व्यर्थ

IND vs IRE 2nd T20 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. 226 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला आयर्लंडचा संघ 221 धावांपर्यंतच मजल मारु शकला. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 4 धावांनी बाजी मारली.
नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. अखेरच्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाने सामन्यात तीन बदल करत रवी बिश्नोई, संजू सॅमसन आणि हर्षल पटेल यांना संघात स्थान दिले. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. इशान किशन अवघ्या 3 धावा करत तंबूत परतला.
यानंतर मैदानात आलेल्या दिपक हुडाने संजू सॅमसनला मोलाची साथ देत भारतीय संघाचा डाव सावरला. दोन्ही खेळाडूंनी आयर्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाचं समाचार घेतला. मैदानात जम बसवल्यानंतर विशेषकरुन दिपक हुडाने आक्रमक पवित्रा आजमावत फटकेबाजीला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने संजू सॅमसनही त्याला चांगली साथ दिली.दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्येही 176 धावांची भागीदारी झाल्यानंतर आडेरने भारताची जमलेली जोडी फोडली. 77 धावांची खेळी करुन सॅमसन बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमारने सुरुवातीला काही चांगले फटके खेळले मात्र तो जास्त वेळ टिकू शकला नाही तो 15 धावा करत बाद झाला. दरम्यानच्या काळात दिपक हुडाने आपलं शतक पूर्ण करत विक्रमाची नोंद केली. परंतू अखेरच्या षटकांत फटकेबाजीच्या प्रयत्नात तो देखील 104 धावांची खेळी करुन माघारी परतला. त्याने 9 चौकार आणि 6 षटकार लगावले.
What a thriller we’ve witnessed 😮#TeamIndia win the 2nd #IREvIND by 4 runs and seal the 2-match series 2️⃣-0️⃣ 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/6Ix0a6evrR pic.twitter.com/6GaXOAaieQ
— BCCI (@BCCI) June 28, 2022
यानंतर भारताच्या मधल्या फळीने थोडी निराशा केली. दिनेश कार्तिक, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल हे तिन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यामुळे दणक्यात सुरुवात केल्यानंतरही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे भारताच्या धावगतीला वेसण बसली. अखेरीस आयर्लंड भारताला 225 धावांवर रोखण्यात यशस्वी झाला.
प्रत्युत्तरादाखल आयर्लंडच्या संघानेही जोरदार प्रत्युत्तर देत चांगली सुरुवात केली. पॉल स्टर्लिंग आणि अँडी बाल्बरिन यांनी पहिल्या ओव्हरपासून फटकेबाजीला सुरुवात करत भारताला आव्हान दिलं. पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी झाल्यानंतर रवी बिश्नोईने स्टर्लिंगचा अडसर दूर केला, त्याने 40 धावा केल्या. यानंतर गॅरेथ डेलने चोरटी धाव काढण्याच्या तयारीत आपली विकेट फेकली.त्यानंतर बाल्बरिन आणि टेक्टॉर जोडीने मैदानावर आपला जम बसवत आयर्लंडला आधार दिला. या दोघांमधली छोटेखानी भागीदारी मोठी होणार असे वाटत असतानाच बाल्बरिन हर्षल पटेलच्या बॉलिंगवर बाद झाला. त्याने 36 बॉलमध्ये 3 फोर आणि 7 सिक्स लगावत 60 धावांची खेळी केली. यानंतर लॉरेन टकरही उमरान मलिकच्या बॉलिंगवर बाद झाला.
टकर माघारी परतल्यानंतर टेक्टॉरने डॉक्रेलच्या साथीने पुन्हा एकदा फटकेबाजीला सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडचं सामन्यातलं आव्हान टिकून राहिलं होतं. विशेषकरुन टेक्टॉरने काही सुरेख फटके खेळले. अखेरीस भुवनेश्वर कुमारने टेक्टॉरला बाद करत आयर्लंडची जोडी फोडली. परंतू डॉक्रेलने अखेरपर्यंत आपली झुंज कायम सुरु ठेवली. शेवटच्या षटकात आयर्लंडला जिंकण्यासाठी 17 धावांची गरज होती.
हार्दिकने उमरान मलिकला शेवटची ओव्हर दिली. पहिला बॉल निर्धाव टाकल्यानंतर उमरान मलिकने दुसरा बॉल नो-बॉल टाकत आयर्लंडला सामन्यात परतण्याची संधी दिली. शेवटच्या दोन बॉलमध्ये आयर्लंडला विजयासाठी 7धावांची गरज होती तेव्हा उमरान मलिकने पुन्हा एकदा टिच्चून मारा करत आयर्लंडच्या अडचणी वाढवल्या. अखेरीस आयर्लंडला 221 धावांपर्यंत रोखत भारताने 4 धावांनी सामना जिंकत मालिका 2-0 ने खिशात घातली.