IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये सूर्यकुमारच्या बॅटचा गडगडाट, वादळी शतकासह पाडला विक्रमांचा पाऊस

WhatsApp Group

 IND vs ENG: रविवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात भारताला 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 7 बाद 215 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ संपूर्ण षटके खेळून 9 गडी गमावून 198 धावाच करू शकला. सूर्यकुमार यादवने भारतासाठी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. सूर्याच्या शतकामुळे भारत एका क्षणी विजयाच्या जवळ पोहोचला होता. पण 19व्या षटकात त्याची विकेट गेली आणि भारताला सामना गमवावा लागला. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका आधीच आपल्या नावावर केली होती.

इंग्लंडच्या 216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्याने अवघ्या 48 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याचे T20 कारकिर्दीतील पहिले शतक होते. T20 मध्ये शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला. सूर्याने 55 चेंडूत 117 धावा केल्या. यादरम्यान त्याने केवळ चौकार आणि षटकारांसह 92 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि सहा षटकार मारले. 31 वर्षीय उजव्या हाताच्या सूर्याने चौथ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसोबत 119 धावांची विक्रमी भागीदारी केली. यासोबतच त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले.

सूर्याने T20 मध्ये भारतासाठी तिसरे जलद शतक झळकावले. याआधी रोहित शर्माने 35 चेंडूत आणि केएल राहुलने 46 चेंडूत शतक झळकावळे आहे. T20 मध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वात मोठी खेळी खेळणारा सूर्या हा जगातील दुसरा फलंदाज आहे. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने 2013 मध्ये 156 धावा केल्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमारने चौथी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली आहे. त्याच्या आधी एविन लुईसने (125*) भारताविरुद्ध 2017 मध्ये सर्वात मोठी खेळी खेळली होती. यानंतर बाबर आझम (122) आणि रिचर्ड लेव्ही (117*) यांनी मोठी खेळी केली आहे.