
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कोरोनाची लागण झालेला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची तब्येत अजुनही सुधारलेली नसल्याने त्याच्या जागेवर जसप्रीत बुमराह आता भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने याबद्दलची बातमी दिली आहे.
कपिल देव यांच्यानंतर भारतीय संघाचं नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह पहिलाच बॉलर ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच जसप्रीत बुमराहला बीसीसीआयने बढती देऊन भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर उप-कर्णधार केलं होतं.
Rohit Sharma ruled out of 5th Test against England after testing positive for COVID-19 for second time, Jasprit Bumrah to lead
— Press Trust of India (@PTI_News) June 29, 2022
रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकणार असल्यामुळे टीम इंडियाचं मॅनेजमेंट संघात महत्वाचे बदल करु शकतं. मधल्या फळीत हनुमा विहारी किंवा श्रीकर भरतला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. हनुमा विहारीने याआधी भारतीय संघाकडून खेळत असताना सलामीला फलंदाजी केली आहे. परंतू यादरम्यान त्याची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नव्हती. परंतू श्रीकर भरतने सराव सामन्यामध्ये सातव्या क्रमांकावर आणि दुसऱ्या डावात सलामीला फलंदाजीसाठी येताना आश्वासक धावा करुन सर्वांना प्रभावित केलं होतं, त्यामुळे या दोन्ही खेळाडूंपैकी एकाला रोहितच्या अनुपस्थितीत संधी मिळू शकते.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत: शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड: अॅलेक्स ली, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), बेन फॉक्स/सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), मॅटी पॉट्स/जेमी ओव्हरटन, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.