IND vs ENG: भारताने नोंदवला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय!

WhatsApp Group

IND vs ENG 3rd Test: भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. भारताने इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले, ज्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ अवघ्या 122 धावांवर ऑलआऊट झाला. अशा प्रकारे भारताने हा सामना 434 धावांनी जिंकला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. ऐतिहासिक विजयाची नोंद करून भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

इंग्लंडविरुद्ध 434 धावांनी मिळवलेला विजय हा धावांच्या बाबतीत टीम इंडियाचा सर्वात मोठा कसोटी विजय आहे. याआधी 2021 साली भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना 372 धावांनी जिंकला होता, जो टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय होता. एकूणच पाहिल्यास भारतीय संघ कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय नोंदवण्याच्या बाबतीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी वेस्ट इंडिजचा संघ कसोटीतील सर्वात मोठा विजय नोंदवण्याच्या बाबतीत आठव्या स्थानावर होता. वेस्ट इंडिजने 1976 साली इंग्लंडविरुद्धचा सामना 425 धावांनी जिंकला होता. पण टीम इंडियाने आता वेस्ट इंडिजचा 48 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. 1928 साली इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना 675 धावांनी जिंकला होता.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवलेले संघ

 • इंग्लंड- 675 धावा
 • ऑस्ट्रेलिया- 562 धावा
 • बांगलादेश- 546 धावा
 • ऑस्ट्रेलिया- 530 धावा
 • दक्षिण आफ्रिका- 492 धावा
 • ऑस्ट्रेलिया- 491 धावा
 • श्रीलंका- 465 धावा
 • भारत- 434 धावा
 • वेस्ट इंडिज- 425 धावा
 • न्यूझीलंड- 423 धावा

कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत भारताचा सर्वात मोठा विजय

 • 434 वि इंग्लंड, 2024
 • 372 वि न्यूझीलंड, 2021
 • 337 वि दक्षिण आफ्रिका, 2015
 • 321 वि न्यूझीलंड, 2016
 • 320 वि ऑस्ट्रेलिया, 2008

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी भारतीय संघासाठी उत्कृष्ट शतके झळकावली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 445 धावा केल्या. यानंतर गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत इंग्लंडचा संघ 319 धावांत आटोपला. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावाच्या आधारे 126 धावांची आघाडी मिळाली. जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या डावात भारताकडून चांगली कामगिरी केली. या खेळाडूंमुळेच टीम इंडियाने दुसऱ्या डावात 430 धावा करून डाव घोषित केला आणि इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य दिले होते.

INSIDE MARATHI आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि शेअर चॅटवर आम्हाला फॉलो करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!