
IND vs ENG : इंग्लंडने एजबॅस्टन कसोटीत भारतावर 7 गडी राखून विजय मिळवून या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने यजमानांसमोर विजयासाठी 278 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, मात्र जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी शतकी खेळी करत हे लक्ष्य सहज पार केले. रूटने 142 आणि बेअरस्टोने नाबाद 114 धावा केल्या. इंग्लंडच्या 7 विकेट राखून मिळवलेल्या या विजयामुळे 5 कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशा बरोबरीत सुटली आहे.
RECORD BREAKERS!! 🦁🦁🦁
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/P6Y7kFqsCc
— England Cricket (@englandcricket) July 5, 2022
दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव 245 धावांत आटोपला. पहिल्या डावात शतकी आघाडी घेतल्यामुळे भारताने इंग्लंडला विजयासाठी 378 धावांचं आव्हान दिलं. सामन्यात पहिले साडेचार दिवस वर्चस्व गाजवून असलेल्या भारतीय संघाचे फासे चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात उलटे पडायला लागले. सलामीवीर लीस आणि क्रॉली यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन इंग्लंडला भक्कम सुरुवात करुन दिली.
कर्णधार जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेत इंग्लंडला धक्के दिले. मात्र त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि जो रुट यांनी पुन्हा एकदा महत्वपूर्ण भागीदारी रचत इंग्लंडची बाजू वरचढ केली. दोघांनीही फटकेबाजी करत चौथ्या दिवसाच्या अखेरीस संघाला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. इंग्लंडला शेवटच्या दिवसात विजयासाठी 119 धावांची गरज होती.
अखेरच्या दिवसात भारतीय गोलंदाज आक्रमक पवित्रा आजमावतील अशी अपेक्षा होती. परंतू पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाज बॅकफूटवरच पहायला मिळाले. बहुतांश सर्व भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीतून पराभव दिसायला लागला होता. याचाच फायदा घेत बेअरस्टो आणि रुट यांनी दमदार फटकेबाजी करत अवघ्या दीड तासात 119 धावा पूर्ण करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. जॉनी बेअरस्टोने पहिल्या डावातही शतक झळकावून इंग्लंडला चांगली धावसंख्या उभारुन देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आता 7 जुलैपासून भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.