Ind Vs Eng 3rd T20: सूर्यकुमार यादवचे शतक पाण्यात, इंग्लंडने 17 धावांनी जिंकला सामना

WhatsApp Group

Ind Vs Eng 3rd T20: रविवारी (10 जुलै) ट्रेंटब्रिज येथे खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. इंग्लंडने भारताला 216 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र टीम इंडियाला केवळ 198 धावा करता आल्या. इंग्लंडने हा सामना 17 धावांनी जिंकला. भारताकडून सूर्यकुमार यादवने वादळी शतक झळकावलं, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. यासह भारताने मालिका 2-1 अशी खिशात घातली आहे.

इंग्लंडकडून भारताला 216 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (11), विराट कोहली (11) आणि ऋषभ पंत (1) स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. पण सूर्यकुमार यादवने 117 धावांची तुफानी इनिंग खेळली, एका क्षणी तो टीम इंडियाला विजय मिळवून देईल असे वाटत होते. पण 19व्या षटकात त्याची विकेट गेली आणि भारताला सामना गमवावा लागला.

सूर्यकुमार यादवने आपल्या 117 धावांच्या खेळीत उत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन घडवले. त्याने केवळ 55 चेंडूत 14 चौकार आणि 6 षटकारांसह 117 धावा केल्या. टीम इंडियाकडून टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो पाचवा खेळाडू आहे. टीम इंडियाच्या खेळाडूचा हा दुसरा सर्वाधिक स्कोर आहे. रोहितच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 118 रनचा विक्रम आहे.

अवघ्या 31 धावांवर टीम इंडियाने पहिले तीन विकेट गमावले होते. यानंतर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यात 119 धावांची भागीदारी झाली, जी केवळ 62 चेंडूत झाली. श्रेयस अय्यरला केवळ 28 धावा करता आल्या, मात्र सूर्यकुमार यादवची फलंदाजी कायम राहिली. मात्र या दोन फलंदाजांशिवाय एकही फलंदाज धावा करू शकला नाही.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने झटपट सुरुवात केली, कर्णधार जोस बटलर चांगला खेळताना दिसत होता मात्र त्याला केवळ 18 धावा करता आल्या. जेसन रॉय (27), फिल सॉल्ट (8) यांनी धावा केल्या. पण इंग्लंडसाठी खरी कामगिरी डेव्हिड मलानने केली, ज्याने अवघ्या 39 चेंडूत 77 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 5 षटकारांचाही समावेश आहे. नंतर लियाम लिव्हिंगस्टोनने 29 चेंडूत 42 धावांची शानदार खेळी खेळली. लियामने आपल्या डावात 4 षटकार ठोकले. या सामन्यात इंग्लंडने 215 धावा केल्या, जी भारताविरुद्धची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.