IND vs AUS: स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय मालिकेतही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

WhatsApp Group

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सोमवारी टीम इंडियाने 2-1ने जिंकत संपली. आता 17 मार्चपासून दोन्ही देशांदरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मायदेशी परतलेला पॅट कमिन्स शेवटचे दोन कसोटी सामने खेळू शकला नाही. चौथ्या कसोटीपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते. या कारणामुळे तो आता एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर होणार आहे. म्हणजेच जोश हेझलवूडनंतर पॅट कमिन्सची अनुपस्थिती कांगारू संघासाठी मोठी समस्या बनू शकते.

गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये कमिन्सच्या जागी संघाची धुरा सांभाळणारा स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय मालिकेतही ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्या वक्तव्याचा हवाला देत ही माहिती समोर आली आहे. त्यांनी सांगितले की, पॅट परत येऊ शकणार नाही. त्याच्यासोबत जे घडले त्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. आमचे विचार त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहेत जे यावेळी कठीण परिस्थितीतून जात आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी अॅरॉन फिंचच्या निवृत्तीनंतर पॅट कमिन्सकडे कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाची कमानही सोपवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्याने केवळ दोन सामन्यांत संघाची धुरा सांभाळली आहे.

प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी पॅट कमिन्सबाबत वाईट बातमी दिली, तर काही चांगली बातमीही दिली. दिल्ली कसोटीत दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या डेव्हिड वॉर्नरचे संघात पुनरागमन होत असल्याची पुष्टी त्यांनी केली. त्याचबरोबर कसोटी मालिकेदरम्यान मायदेशी परतलेला अॅश्टन अगर वनडे मालिकेतही दिसणार आहे. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्शसारखे स्टार खेळाडूही दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन करत आहेत. जर आपण कमिन्सच्या बदलीबद्दल बोललो, तर सध्या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. याआधी दुखापतग्रस्त झाय रिचर्डसनच्या जागी नॅथन एलिसचा संघात समावेश करण्यात आला होता.