IND vs AFG: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याने एकदिवसीय तसेच टी-20 मध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. आता त्याने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेकसाठी उतरताच रोहितने असा विक्रम केला आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी कोणताही पुरुष खेळाडू करू शकला नव्हता.
रोहित शर्माच्या नावावर ऐतिहासिक विक्रम
अफगाणिस्तानविरुद्ध खेळला जाणारा दुसरा टी-20 सामना हा रोहित शर्माच्या कारकिर्दीतील 150 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्याच्या आधी, कोणत्याही खेळाडूने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 टी-20 सामने खेळलेले नाहीत. 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो जगातील पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. या यादीत पॉल स्टर्लिंग दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 134 टी-20 सामने खेळले आहेत.
सर्वाधिक टी-20 सामने खेळलेले खेळाडू
- रोहित शर्मा- 150 सामने
- पॉल स्टर्लिंग – 134 सामने
- जॉर्ज डॉकरेल- 128 सामने
- शोएब मलिक- 124 सामने
- मार्टिन गप्टिल- 122 सामने
रोहित शर्माची टी-20 कारकीर्द
रोहित शर्माने आतापर्यंत 141 टी-20 डावांमध्ये 3853 धावा केल्या आहेत, ज्यात चार शतकांचा समावेश आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 अर्धशतके झळकावली आहेत.