
पणजी – प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होणार आहे. गोवा पोलिसांनी पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांच्याविरुद्ध अश्लील व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. हे प्रकरण 2020 चे आहे. अश्लीलता, अनधिकृत प्रवेश आणि अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याशी संबंधित विविध कलमांतर्गत कानाकोण न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग यांच्यासमोर गेल्या आठवड्यामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, असे कानाकोण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण गवस यांनी मंगळवारी पीटीआयला सांगितले आहे.
कानाकोण भागातील सरकारी चापोली धरणावर अश्लील व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल नोव्हेंबर 2020 मध्ये पांडे आणि बॉम्बे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, असं अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर दोघांना अटक करून नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ३९ साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे गवस यांनी सांगितलेआहे.