सीएसके चा ‘इंटर्न’: ऋतुराज गायकवाड

WhatsApp Group

मुंबई विरुद्ध चेन्नई आयपीएलच नाही तर क्रिडा विश्वातील चर्चिली जाणारी रायव्हलरी. आयपीएलचा तेरावा हंगाम स्थगित व्हायचा आधी झालेल्या एका चेन्नई विरूद्ध मुंबई सामन्यात चेन्नईच्या संघाने दिलेल्या २१९ धावांचा आव्हानाचा कायरन पोलार्ड नामक वादळाने अक्षरशः पालापाचोळा केला होता. त्या सामन्यानंतर सीएसके आणि एमआय आपल्या २०२० आयपीएलचा फॉर्ममध्ये परत आले की काय, अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली होती.

कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलचा उर्वरित भाग आखाती देशात म्हणजे दुबई-अबुधाबी-शारजा येथे खेळवण्यात आला. त्या उर्वरित भागाचा क्रिकेटच्या एल क्लासिको म्हणजेच मुंबई विरुध्द चेन्नई सामन्याने प्रारंभ झाला. बोल्ट, बुमराह, मिल्न या तिघांच्या वेगवान माऱ्यामुळे सीएसकेची टीम २४ ला ४ विकेट अशा बिकट परिस्थितीत सापडली. शिवाय दुखापतीमुळे रायडुने पॅव्हेलियनचा रस्ता पकडला होता. ह्या कठीण प्रसंगात शानदार नाबाद ८८ धावा करत त्याने संघाला सन्मानजनक धावसंख्याच उभारून दिलीच नाही तर एका थरारक सामन्यात २० धावांनी विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला तो खेळाडू म्हणजे ऋतुराज दशरथ गायकवाड.

२०१९ साली धोनी, जाडेजा, ब्रावो, वॉटसन, रैना असे मातब्बर खेळाडू असणाऱ्या त्या पर्वात २० लाखांची बोली लागलेल्या ऋतुराजला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्या सिनीयर खेळाडुंच्या मध्ये मल्टी नॅशनल कंपनीत जॉइन झालेल्या इंटर्न’ सारखाच तो वाटत होता. २०२० च्या आयपीएलच्या सुरूवातीला तो कोवीड पॉझिटिव्ह झाल्याने आणि लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने किंवा धोनी सरांना त्याच्यातला स्पार्क न दिसल्याने त्याला संघातली जागा गमवावी लागली. चेन्नई सुपर किंग्जसाठी तो मोसमच लक्षात न ठेवण्यासारखा होता. प्लेऑफच्या शर्यतीतुन बाहेर पडल्यावर शेवटच्या काही सामन्यात त्याची सलामीला वर्णी लागली. त्या तीन सामन्यातच त्याने आपल्या गुणवत्तेची चुणुक दाखवली. ६५, ७२, ६२ धावा करून तिनही सामन्यात सामनावीर ठरलाच पण सलग तीन सामन्यात आयपीएलमध्ये अनकॅप खेळाडू कडुन अर्धशतक करण्याचा विक्रम देखील केला. त्या तीन अर्ध शतकांच्या जोरावर त्याने पुढच्या सीझनला सलामीची जागा पटकावली होती. आक्रमक, अन-ऑर्थोडॉक्स फटके खेळण्याच्या काळात एक युवा खेळाडू कॉपी बुक स्टाईलचे फटके खेळून, सरळ रेषेत खेळून धावा जमवतोय ह्याचा वस्तुपाठ घालून दिला.

२०२१ चा सुरूवातीच्या मोसमात अपयश येऊनही चेन्नई संघ व्यवस्थापनेनं त्याच्यावर विश्वास ठेवला. आपल्यावरचा विश्वास ऋतुराजने कलकत्ता विरूद्ध वानखेडे मैदानावर आक्रमक ६४ धावा करत सार्थ ठरवला. त्यानंतर संपूर्ण आयपीएल २०२१ मध्ये (भारत+ युएई) पाच डावात ३० पेक्षा जास्त धावा, ४ सामन्यांत अर्धशतक तर राजस्थान रॉयल्स विरुद्ध शेवटच्या चेंडूवर वर षटकार खेचत शतक झळकावले. या मोसमातच सर्वाधिक धावा जमवत ऋतुराज ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. एकाच वर्षी इमर्जिंग आणि ऑरेंज कॅप मिळवणारा गायकवाड एकमेव खेळाडू आहे. या इंटर्नने नुसती सलामीची समस्या सोडवली नाही तर सीएसके ला चौथं विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचललाय. २०१९ साली सीएसके नावाच्या मल्टी नॅशनल कंपनीतला इंटर्न आता मॅनेजर नक्की झालाय. कारण २०२२ चा मेगा ऑक्शन आधी ब्रावो, डु प्लेसिस सॅम करनसारखे खेळाडुंचे पर्याय असताना ऋतुराजला रिटेन करण्यात आलं आहे.

वयाच्या तेराव्या वर्षी वेंगसरकर अकॅडमीमध्ये ऋतुराजच्या क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात झाली. २०१४-१५ साली झालेल्या कूच-बिहार स्पर्धेत सर्वाधिक धावा करत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आपली दखल घ्यायला भाग पाडले. महाराष्ट्र संघाच्या विविध एज गृप (Age Group) क्रिकेटमध्ये सिध्द केल्यावर एकोणिसाव्या वर्षी त्याने महाराष्ट्राच्या रणजी संघातुन पदार्पण केले. २०१८-१९ ही दोन वर्षे गायकवाडचा क्रिकेट करियरला टर्निंग पॉइंट देणारी वर्ष ठरली. याकाळात गायकवाडने रणजी मध्ये ४५६ तर विजय हजारे ट्रॉफी मध्ये ३६५ धावा केल्या. तर २०१९ मध्ये बोर्ड प्रेसिडेंट इलेवन कडुन खेळताना इंग्लंड लायन्स विरूध्द शतक देखील झळकावले. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याला भारत अ संघाचे दरवाजे उघडले. आपल्या पहिल्या अ संघाच्या सामन्यात त्याला भोपळा देखील फोडता आला नव्हता. शून्यावर बाद हा त्याच्यासाठी काळा तीट ठरला. त्यानंतर लंका आणि विंडीज अ संघाविरूध्द ११२ च्या सरासरीने आणि ११६ च्या स्ट्राईक रेटने ६६७ धावा चोपल्या.

वयाच्या सहाव्या वर्षी आपल्या वडिलांसोबत ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्युझिलंडचा सामना बघायला गेलेला लहानग्या ऋतुराजला मॅक्युलमने प्रभावित केले. आणि घरामध्ये शैक्षणिक वातावरण असलेल्या ऋतुराजने क्रिकेट मध्ये करिअर करण्याचं स्वप्न पाहिले. आज अठरा वर्षानंतर विजय हजारे ट्रॉफी, रणजी, सय्यद मुश्ताक पासून ते आयपीएलपर्यंत अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहे.

– वरद सहस्रबुद्धे