IND vs NZ: चक दे इंडिया! भारत World Cupच्या फायनलमध्ये, न्यूझीलंडचा 70 धावांनी केला पराभव
टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघ तब्बल 12 वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताने शेवटचा 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता.
World Cup 2023: भारतीय संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयात विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमीचे महत्त्वाचे योगदान होते. कोहली आणि अय्यरने फलंदाजीत शतके झळकावली, तर शमीने गोलंदाजीत सात बळी घेतले. न्यूझीलंडने 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला होता. अशा प्रकारे भारताने चार वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेतला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत टीम इंडियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 397 धावा केल्या. पहिल्या डावानंतर टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने चांगलीच टक्कर दिली. डॅरिल मिशेलने न्यूझीलंडच्या आशा शेवटपर्यंत जिवंत ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्याने 119 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 134 धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याची खेळी संघाला उपयोगी पडू शकली नाही.
प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने भारतासाठी 117 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, जे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 50 वे शतक होते. याशिवाय श्रेयस अय्यरने 105 धावा केल्या. शुभमन गिलने 80 धावा करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रत्येक वेळेप्रमाणे रोहित शर्माने चांगली सुरुवात करून 29 चेंडूत 47 धावांची शानदार खेळी केली.
𝗢𝗻𝗲 𝘀𝘁𝗲𝗽 𝗰𝗹𝗼𝘀𝗲𝗿! 🏆#TeamIndia 🇮🇳 march into the FINAL of #CWC23 🥳#MenInBlue | #INDvNZ pic.twitter.com/OV1Omv4JjI
— BCCI (@BCCI) November 15, 2023
398 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 2 गडी लवकर गमावले. मात्र, असे असतानाही न्यूझीलंडने सामना पूर्णपणे भारताच्या ताब्यात असल्याचे जाणवू दिले नाही. किवी संघाला सुरुवातीचे दोन्ही धक्के मोहम्मद शमीने दिले, ज्याने सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवे (13) आणि 8व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रचिन रवींद्रला (13) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दोन विकेट लवकर पडल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 149 चेंडूत 181 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी मोहम्मद शमीने 33व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर किवी कर्णधार केन विल्यमसनची विकेट घेत मोडली. विल्यमसनने 73 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. शमी इथेच थांबला नाही आणि षटकाच्या चौथ्या चेंडूवर टॉम लॅथमला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
न्यूझीलंडने 220 धावांवर चार विकेट गमावल्यानंतर पुन्हा एकदा भारताचा वरचष्मा राहिला. मात्र पाचव्या विकेटसाठी डॅरिल मिशेलने ग्लेन फिलिप्ससोबत भागीदारी सुरू केल्याने भारतीय संघाचा तणाव पुन्हा एकदा वाढला. फिलिप्स आणि मिशेल यांनी पाचव्या विकेटसाठी 75 धावांची (61 चेंडू) भागीदारी केली, जी जसप्रीत बुमराहने 43 व्या षटकात फिलिप्सची विकेट घेत मोडून काढली. यानंतर 44व्या षटकात कुलदीप यादवने मार्क चॅम्पमनला (02) पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
त्यानंतर संघाला मोठा दिलासा देत मोहम्मद शमीने शतक झळकावून खेळत असलेल्या डॅरिल मिचेलला बाद केले. शमीने 46व्या षटकात मिशेलला बाद केले, जो 134 धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यातील शमीची ही पाचवी विकेट होती. यानंतर 48व्या षटकात मिचेल सँटनर 09 धावांवर, 49व्या षटकात टीम साऊदी 09 धावांवर बाद झाला आणि 49व्या षटकात लॉकी फर्ग्युसनही 06 धावांवर शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला.
🏆 INDIA IN THE FINAL OF WORLD CUP 2023 🏆
7/57 – THE BEST-EVER FIGURES BY AN INDIAN IN AN ODI!
HISTORY ☑️☑️#INDvsNZ #MohammedShami #ViratKohli pic.twitter.com/HQcBbfaDFa
— Cricbuzz (@cricbuzz) November 15, 2023
मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी
भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सर्वाधिक 7 बळी घेतले. यादरम्यान त्याने 9.5 षटकात 57 धावा दिल्या. याशिवाय सिराज, बुमराह आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.