IND vs ENG 2nd ODI: इंग्लंडचा भारतावर तगडा विजय, मालिकेत साधली बरोबरी

WhatsApp Group

IND vs ENG 2nd ODI: विश्वविजेत्या इंग्लंड क्रिकेट संघाने गुरुवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 100 धावांनी पराभव केला. या विजयानंतर इंग्लंडच्या संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दोन्ही संघांमधील तिसरा आणि निर्णायक वनडे 17 जुलै रोजी मँचेस्टर येथे खेळवला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करताना युझवेंद्र चहलच्या चार विकेट्समुळे इंग्लंडला 49 षटकांत 246 धावांत गुंडाळले. मात्र, त्यानंतर पाहुण्या संघाला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि भारताला या सामन्यात 38.5 षटकांत केवळ 146 धावाच करता आल्या.

इंग्लंडकडून मिळालेल्या 247 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि पाहुण्या संघाने 31 धावांपर्यंत चार विकेट गमावल्या. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (0), शिखर धवन (9), विराट कोहली (16) आणि ऋषभ पंत (0) यांच्या विकेट्सचा समावेश आहे. यानंतर सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्याने पाचव्या विकेटसाठी 54 चेंडूत 42 धावांची भागीदारी केली. मात्र 27 धावा करून सूर्यकुमार बोल्ड झाला. 73 धावांवर पाचवी विकेट गमावल्याने टीम इंडिया अडचणीत आली. त्यानंतर पांड्या आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मोईन अलीने हार्दिकला बाद करून भारताला मोठा धक्का दिला. हार्दिकने 44 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 29 धावांचे योगदान दिले.

शेवटी मोहम्मद शमीने काही चांगले फटके खेळून भारताच्या आशा उंचावण्याचा प्रयत्न केला. शमी आणि जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी 47 चेंडूत 39 धावांची भागीदारी केली. 140 धावांवर शमीची विकेट पडली. शमीने 28 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 23 धावा केल्या. शमी बाद होताच पुढच्याच चेंडूवर जडेजाही बाद झाला. त्याने 44 चेंडूत 29 धावा केल्या. शमी आणि जडेजा बाद झाल्यानंतर भारतीय संघ 38.5 षटकात 146 धावांवर आटोपला.

इंग्लंडसाठी रीस टोपलीने 9.5 षटकात 24 धावा देत 6 विकेट्स घेतले. त्याच्याशिवाय डेव्हिड विली, ब्रायडेन कार्स, मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.