मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयने अमेरिकेकडे मदत मागितली आहे. सुशांतच्या ईमेल आणि सोशल मीडिया अकाउंट्सची डिलीट केलेली माहिती मिळवण्यासाठी तपास यंत्रणेने अमेरिकन कंपन्यांकडून मदत मागितली आहे. प्रकरणाचा तपास करणार्या एजन्सीला भूतकाळातील नोंदी देखील पहायच्या आहेत, जेणेकरून आत्महत्येशी संबंधित काही जुने संबंध असतील तर ते शोधता येतील.
सीबीआयने गुगल आणि फेसबुककडून एमएलएटी म्हणजेच परस्पर कायदेशीर सहाय्यता करारांतर्गत ही माहिती मागवली आहे. यामध्ये अभिनेत्याने हटवलेल्या चॅट, ईमेल किंवा पोस्टचा समावेश आहे. एमएलएटीच्या माध्यमातून दोन्ही देशांना देशांतर्गत तपासात माहिती मिळू शकते. MLAT अंतर्गत, गृह मंत्रालयाला भारतात माहिती शेअर करण्याचा अधिकार आहे. तर अमेरिकेत हे काम अॅटर्नी जनरलच्या कार्यालयातून केले जाते.
अहवालात एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, “आम्ही केसला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की अशा काही विशिष्ट हटविलेल्या चॅट्स किंवा पोस्ट्स होत्या ज्या या प्रकरणात उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये रिया चक्रवर्तीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप, दबावामुळे अभिनेत्याने उचललेले आत्महत्येचे पाऊल यांचा समावेश आहे.
सुशांत सिंगच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी सीबीआयच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. सुशांत सिंगच्या मृत्यू प्रकरणात प्रत्यक्षदर्शी किंवा कॅमेरा फुटेज नसणे यासारखे बरेच गूढ आहे आणि मला वाटते की सीबीआय योग्य लीड्स मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.
सुशांत हा गेल्या वर्षी मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. त्याचे वडील केके सिंग यांनी 25 जून रोजी रिया चक्रवर्ती, तिचे आई-वडील आणि भाऊ शोविक यांच्याविरोधात पाटणा पोलिसात तक्रार दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने ऑगस्ट 2020 मध्ये या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीबीआयशिवाय अंमलबजावणी संचालनालय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोही या प्रकरणाचा तपास करत आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने सुशांतच्या मृत्यूला आत्महत्या असल्याचे म्हटले होते .