
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामधून एक संतापजनक घटना समोर आली आहहे. एका सुशिक्षित व्यापाऱ्याने मुलगा व्हावा यासाठी एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून घरात अघोरी पूजा करत आपल्या पत्नीला सर्वांसमोर आंघोळ करायला लावली. एवढेच नव्हे तर या विवाहितेला पैशांसाठी मारहाणही देखील केली. या प्रकरणी पती, सासू, सासऱ्यासह मंत्रिकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर पती, सासरा आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठामध्ये जादूटोणा आणि नरबळी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार 03-05-2022 ते आज पर्यंत घडला आहे. पीडितेचे शिवराज कोरटकर यांच्याशी विवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस दोघे चांगले नांदले. मात्र, काही दिवसानंतर पैशासाठी पीडितेचा छळ करण्यात येऊ लागला. तिला मारहाण देखील करण्यात आली.
लग्नात मिळालेले सर्व दागिने पीडितेचा विश्वास मिळवून आपल्या जवळ ठेवण्यास सांगितले. मात्र, शिवराज याने ते दागिने परस्पर विकले. एवढेच नाही तर फिर्यादीच्या नावावर असलेल्या फ्लॅटचे कागदपत्रे ही परस्पर बँकेत देऊन त्यावर खोटी सही करून बँकेकडून तब्बल 75 लाख रुपयांचे कर्ज घेतले. हा प्रकार होऊनही घरात सुख आणि शांतता नांदावी यासाठी तसेच मुलगा व्हावा यासाठी घरात मांत्रिकाला बोलावले. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून पीडितेला रायगड येथे नेऊन मुलगा व्हावा यासाठी सर्वांसमोर आंघोळ करायला लावली. या नंतरही पीडितेला वारंवार मारहाण करण्यात आली. तिने अनेक वर्ष हा त्रास सहन केला. हा सर्व प्रकार अति झाल्यामुळे पीडितेने भारती विद्यापीठात धाव घेत तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.