नागपूर – नागपूरच्या एमआयडीसी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून गर्भधारणा झालेल्या 12 वर्षीय मुलीचे लग्न लावले. 12 वर्षीय मुलीचे 22 वर्षीय एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून मुलीला गर्भधारणा झाली. हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर दोघांच्याही घरच्यांनी त्यांचे लग्न लावले.
पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्या मुलाला अटक करण्यात आली आहे. माझ्या पतीला सोडा, अशी आर्त हाक निरागस मुलीने पोलिसांना घातली. मी स्वखुशीने त्याच्याशी लग्न केले आहे. यात त्याचा काय दोष असा प्रश्न ती बालिका आता पोलिसांकडे करत आहे. त्यामुळे आता पोलीसही चक्रावून गेलेत. आता करायचं काय असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
वरिष्ठांनी चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी आता त्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर ती बालिका सैरभैर झाली. ज्याच्या आधाराने ती राहत होती त्यालाच अटक झाली. माझ्या पतीचा गुन्हा काय, असं ती वारंवार आता विचारत आहे. यावर कोणाचाही आक्षेप नाही मग माझ्या पतीला सोडा, अशी विनवणी ती आता पोलिसांना करत आहे.