
Mumbai Helmet For Pillion Riders : मुंबईकर बाईक चालकांना आजपासून हेल्मेट घालावंच लागणार आहे. ते ही फक्त बाईक चालकाला नव्हे तर मागे बसलेल्या व्यक्तिलाही. आजपासून मुंबईमध्ये बाईकवरील दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे, नाहीतर मुंबई वाहतूक पोलीस तुम्हाला दंड करायला तयार आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी याबाबत नोटीस जारी केली होती. त्यानुसार आज 9 जूनपासून मुंबई वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम सुरु करण्यात येणार आहे.
नवीन नियमाचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सरकारकडून देखील या नियमाला मान्यता देण्यात आली आहे. हेल्मेट घालणे दुचाकी चालक आणि त्याच्यामागे बसणाऱ्यांच्या हिताचे असल्याचे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले की, पगडी परिधान करणाऱ्या शीखांना हेल्मेट सक्तीतून सूट देण्यात आली आहे.