
सावंतवाडी – राज्य शासन पर्यावरण विभागांतर्गत राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये संपूर्ण कोकण विभागातून सावंतवाडी पालिका अव्वल ठरली. सलग दुसऱ्या वर्षी पालिकेने हा बहुमान पटकावला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर व अन्य कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शासन ‘माझी वसुंधरा’ अभियान राबवित आहे. सावंतवाडी पालिकेने या अभियानामध्ये विविध उपक्रम हाती घेतले होते. कोकण विभागामधील पालिका गटामधून सावंतवाडी अव्वल ठरली. गेल्यावर्षीही अव्वल येण्याचा मान सावंतवाडी पालिकेने मिळविला होता. आता सलग दुसऱ्या वर्षी अव्वल ठरल्यामुळे अधिकारी-पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.
उपमुख्यमंत्री पवार, पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत अधिकारी जयंत जावडेकर, स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, पालिका कर्मचारी गजानन परब, बांदेकर, सफाई कर्मचारी शंकर मेहत्तर, माळी यांना गौरविण्यात आले.