नवी दिल्ली – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी परमबीर सिंह यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, मुंबईत त्यांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे ते येथे येत नाहीत. त्यावर न्यायालयाने म्हटले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त मुंबईत येऊन राहण्यास घाबरतात हे आश्चर्यकारक आहे.
परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात संरक्षणासाठी याचिका दाखल केली आहे. गेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले होते की, जोपर्यंत परमबीर सिंह हे कुठे आहेत हे सांगत नाहीत तोपर्यंत संरक्षण देता येणार नाही.
सोमवारी झालेल्या सुनावणीत परमबीर सिंह यांच्या वकिलाने सांगितले की, ते भारतात असून ते नेपाळला जात असल्याची चर्चा चुकीची आहे. परमबीर सिंह यांनीही आपण सीबीआयसमोर हजर राहण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने दिलासा देत त्यांच्या अटकेला स्थगिती दिली. आता याप्रकरणी पुढील सुनावणी ६ डिसेंबरला होणार आहे
सुनावणीदरम्यान, परमबीर सिंह यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, त्यांच्याकडे नवीन डीजीपीची टेप आहे ज्यामध्ये ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील खटला मागे घेण्यास सांगत आहेत. खटला मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असून तसे न केल्यास अनेक गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. परमबीर सिंह कुठेही फरार होऊ इच्छित नाही, असेही त्यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले.
[BREAKING] Supreme Court grants IPS officer Param Bir Singh protection from arrest after counsel informs Supreme Court that Singh is “very much in India”#SupremeCourt #ParamBirSingh pic.twitter.com/2ZXfZf1gAP
— Bar & Bench (@barandbench) November 22, 2021
या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त मुंबईतच येऊन राहण्यास घाबरतात हे आश्चर्यकारक आहे. न्यायमूर्ती एस.के. कौल म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त मुंबई पोलिसांपासून आपल्याला धोका असल्याचे सांगत असतील तर त्यातून कोणता संदेश जातो?
गेल्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले होते की, जोपर्यंत परमबीर सिंह हे कुठे आहेत हे सांगत नाहीत तोपर्यंत त्यांना कोणतेही संरक्षण मिळणार नाही? तुम्ही परदेशात कुठेतरी असाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत असाल, तर आम्ही ते कसे देऊ, असे न्यायालयाने म्हटले होते.