‘एकनाथजी तुम्ही जर मला आधी सांगितलं असतं तर मीच तुम्हाला मुख्यमंत्रिपदी बसवलं असतं’ – अजित पवार

WhatsApp Group

मुंबई – विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली. त्यानंतर सभागृहामध्ये बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचं अभिनंदन केलं. मात्र यासोबतच त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) कडाडून टिकाही केली. यावेळी बोलताना ‘एकनाथजी तुम्ही मला कानात जरा सांगितलं असतं की, उद्धवजींना सांगा अडीच वर्ष झाले. तर मीच तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं असतं’, असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, राहुल नार्वेकर आदित्य ठाकरेंच्या जवळचे होते. त्यांच्या बरोबर काम केलं होतं. त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या अतिशय जवळ जातात. शिवसेनेमध्ये असताना त्यांनी आदित्य ठाकरेंना आपलं केलं. आमच्याकडे आले आणि मला आपलंसं केलं. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांना आपलंसं केलं. आता एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही त्यांना आपलंसं करून घ्या, नाही तर काही खरं नाही, असा टोलाही अजित पवारांनी यावेळी बोलताना लगावला.

देवेंद्र फडणवीस हे टीव्हीवर बोलत होते. आता मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील. असं ऐकताच एकच शांतता पसरली आणि भाजपचे नेते खळखळा रडायला लागले. कुणाला काहीच समजेना, संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. कुणालाच काही समजेना. गिरीश महाजन यांचं अजून रडणं थांबेना. ते अजूनही बांधलेला फेटा काढतायत आणि डोळे पुसत आहे. खऱ्या अर्थाने एवढ वाईट वाटत आहे की आता काही करू शकत नाही, असा टोलाही अजित पवारांनी यावेळी बोलताना लगावला.