देशभरात कुत्रा चावण्याच्या घटना वाढत असताना पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने कुत्रा चावण्याच्या घटनेतील बळींना 20,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई निश्चित केली आहे. कुत्रा चावल्यास, कुत्र्याच्या प्रत्येक दाताच्या खुणामागे पीडितांना 10,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाईल.
न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांच्या खंडपीठाने सांगितले की, कुत्रा चावल्याप्रकरणी पीडितांना कुत्र्याच्या प्रत्येक दाताच्या चिन्हासाठी किमान 10,000 रुपये दिले जातील. कुत्रा चावल्यामुळे त्वचेवर जखम झाल्यास किंवा मांसाचे नुकसान झाल्यास, 0.2 सेमी पर्यंतच्या जखमेसाठी किमान 20,000 रुपये भरपाई दिली जाईल.
चंदीगड, पंजाब आणि हरियाणातील कुत्रा चावण्यासंदर्भातील 193 याचिकांच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. दरम्यान, न्यायालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कुत्रा चावण्याच्या घटनांची नोंद करण्यासाठी समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारांनी प्राधान्याने जबाबदारी स्वीकारून याबाबत नियमावली बनवावी, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ
पंजाब आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये कुत्रा चावण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या पाच वर्षांत कुत्रा चावण्याच्या 6,50,904 हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. या 6,50,904 पैकी 1,65,119 जण गेल्या वर्षभरात जखमी झाले आहेत.
दरम्यान, चंदीगडमध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये 70 टक्क्यांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे. 2022 मध्ये चंदीगडमध्ये कुत्रा चावण्याच्या 5365 प्रकरणांची नोंद झाली होती तर 2019 मध्ये ही संख्या 18,378 होती.
हरियाणाच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की राज्यात गेल्या दशकात कुत्रा चावण्याच्या 11.04 लाख प्रकरणांची नोंद झाली आहे. अंबाला (1.54 लाख), जिंद (1.43 लाख) आणि रोहतक (1.21 लाख) येथे कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटनांची नोंद झाली आहे.
देशभरात भटक्या कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अनेक घटनांमध्ये पीडितांचा मृत्यूही झाला आहे. अशा परिस्थितीत कुत्रा चावण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.