ICC T20I Ranking: ‘सुर्या’नंतर आता ‘रवी’ चमकला, बनला जगातील नंबर एकचा गोलंदाज

WhatsApp Group

ICC T20I Ranking: ICC ने टी-20 ची नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये एका भारतीय गोलंदाजाने नंबर 1 चे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत या खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली होती. या खेळाडूला आता क्रमवारीत त्याचे बक्षीस मिळाले आहे. त्याचबरोबर अक्षर पटेलला अष्टपैलूंच्या टी-20 क्रमवारीत फायदा झाला असून तो टॉप-20 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रवी बिश्नोई टी-20 मध्ये नंबर 1 गोलंदाज बनला आहे. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानला मागे टाकत त्याने हे स्थान मिळवले आहे. ICC ने जाहीर केलेल्या नवीन टी-20 क्रमवारीत बिश्नोईचे 699 रेटिंग गुण आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राशिद खानचे 692 रेटिंग गुण आहेत. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे 679 रेटिंग गुण आहेत. बिश्नोई व्यतिरिक्त कोणत्याही भारतीय गोलंदाजाचा टॉप-10 मध्ये समावेश नाही.

रवी बिश्नोई ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात मोठा हिरो ठरला. त्याने या मालिकेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने पाच सामन्यात 9 विकेट घेतल्या. यासह त्याने द्विपक्षीय मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत रविचंद्रन अश्विनची बरोबरी केली. ही मालिका त्याच्यासाठी संस्मरणीय ठरली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार देण्यात आला.

अक्षर पटेल अष्टपैलूंच्या टी-20 क्रमवारीत 127 रेटिंग गुणांसह 14व्या स्थानावर आहे. ताज्या अपडेटपूर्वी तो टॉप 20 मध्येही नव्हता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याने एकहाती संघाला विजय मिळवून दिला आणि दोन्ही सामन्यांमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावला. अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांमध्ये 6 विकेट्स घेतल्या होत्या आणि त्यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 6.20 होता.