Match Fixing: मॅच फिक्सिंगचा आरोप असलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूवर आयसीसीने घातली 17 वर्षांची बंदी

WhatsApp Group

England Cricketer Banned Match Fixing Punishment: इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात संघाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. दरम्यान, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेटला मोठा धक्का बसला असून आयसीसीने त्यांच्या एका क्रिकेटपटूवर साडे 17 वर्षांची बंदी घातली आहे. हा क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळला आहे.

कोण आहे हा क्रिकेटर? – आबुधाबी टी10 क्रिकेट लीगमध्ये मॅच फिक्सिंगचा हा प्रकार समोर आला आहे. इंग्लंडचा क्लब क्रिकेटर रिझवान जावेद (Rizwan Jawed) या प्रकरणी दोषी आढळला आहे. आयसीसीने रिझवानवर साडे-सतरा वर्षांची बंदी घातलीय. ही बंदी इतकी मोठी आहे की या खेळाडूची क्रिकेट कारकिर्दच यात संपुष्टात येतेय. रिझवान जावेदवर 2021 मध्ये आबुधाबी टी10 लीगमध्ये मॅच फिक्सिंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

रिझवानवर गंभीर आरोप – मॅच फिक्सिंगप्रकरणी रिझवान जावेदची चौकशी सुरु होती. त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचं योग्य उत्तर देण्यात रिझवान अपयशी ठरला होता. त्यामुळे आयसीसीने रिझवानला दोषी मानत साडेसतरा वर्षांची बंदी घातली. 19 सप्टेंबर 2023 पासून ही बंदी लागू करण्यात आली आहे. एमिरात क्रिकेट बोर्डाच्या (ECB) अबुधावी टी10 लीगची सुरुवात 2017 मध्ये करण्यात आली. याप्रकरणी रिझवान जावेदसह आणखी आठ खेळाडू आणि अधिकाऱ्यांचा मॅचफिक्सिंग प्रकरणात समावेश आहे. आयसीसीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या सर्वांवर आरोप ठेवले होते.

नासिर हुसैनवर सुद्धा मॅच फिक्सिंगचा आरोप – रिझवान जावेद शिवाय बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटर नासिर हुसैनवर सुद्धा मॅच फिक्सिंगचा आरोप आहे. त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आयसीसी नियमानुसार रिझवानवर 2.1.1 , अनुच्छेद 2.1.3, अनुच्छेद 2.4.4 आणि अनुच्छेद 2.4.6 नुसार कारवाई करण्यात आली आहे. यात रिझवानला निकालाला प्रतिआव्हान करता येणार नाही.