मी कधीच समोर कोण बॉलर आहे हे पाहत नाही! शतकी खेळीनंतर पंतची प्रतिक्रीया

WhatsApp Group

इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ गाजवला तो ऋषभ पंतने. टीम इंडिया संकटात सापडलेली असताना ऋषभने रविंद्र जाडेजासोबत सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. या खेळीदरम्यान पंतने आपलं कसोटी क्रिकेटमधलं पाचवं शतकही झळकावलं.

जेम्स अँडरसन, जॅक लिच, कर्णधार बेन स्टोक्स यासारख्या सर्वच गोलंदाजांवर ऋषभ पंत तुटून पडला होता. मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी करत त्याने इंग्लंडच्या सर्व बॉलर्सची लयच बिघडवली. अखेरीस १४६ धावांवर जो रुटने त्याला आऊट केलं. पंतने पहिल्या दिवसाच्या खेळात जॅक लिचला आपलं लक्ष्य बनवलं याविषयी विचारलं असता, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना ऋषभने आपली भूमिका स्पष्ट केली.

ऋषभ म्हणाला, मी कधीच समोर कोण बॉलर आहे हे पाहत नाही. तो कशा प्रकारे बॉलिंग करतोय याकडे माझं लक्ष असतं. एखाद्या बॉलरवर ठरवून हल्लाबोल करायचा हे मी ठरवून जात नाही. जर मला वाटलं की या बॉलवर मोठा शॉट खेळू शकतो तर मी खेळतो. मी समोर कोण प्रतिस्पर्धी आहे याचा फारसा विचार कधी करत नाही. मी प्रत्येक सामन्यात १०० टक्के कामगिरी कशी होईल याचा प्रयत्न करत असतो, माझं माझ्या खेळाकडे लक्ष असतं.

मी लहानपणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलो त्या सरांनीही मला सांगितलं होतं की तू मोठे शॉट्स खेळू शकतोस आता तुझ्या डिफेन्सकडे लक्ष दे. त्यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये मी माझ्या डिफेन्सवर जास्त लक्ष देतो, ते देखील महत्वाचं असल्याचं ऋषभ पंतने यावेळी सांगितलं.