
अभिनेत्री केतकी चितळे Ketki Chitale हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यामध्ये वातावरण चांगलचं तापलेलं आहे. सर्व पक्षांकडून केतकीच्या पोस्टवर निषेध व्यक्त केला जात असताना आता सदाभाऊ खोत यांनी मात्र तिला समर्थन केलेलं दिसत आहे.
रयत क्रांती संघटनेनं केतकीने केलेल्या पोस्टचं समर्थन केलं आहे. केतकी चितळेचा आम्हाला अभिमान आहे, असं वक्तव्य करत सदाभाऊ खोत यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.
“केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयामध्ये तिने स्वत:ची बाजू मांडली. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा प्रस्थापितांविरोधात आहे”, असं सदाभाऊ खोत यावेळी बोलताना म्हणाले. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
जहांगीरदारांनी गुन्हा केला तर त्याला माफ करायचं आणि इतरांनी काही केलं तर गुन्हा दाखल करायचा. तुरुंगात डांबायचं. तिला मानावं लागेल. तिने कोर्टात स्वत:ची बाजू मांडली. तिच्या पोस्टनंतर तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या टीका-टिप्पणी एकदा पाहा असं सदाभाऊ खोत यावेळी बोलताना म्हणाले.