भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

WhatsApp Group

मुंबई – लता दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जेव्हा लता दीदी सारख्या मोठ्या बहिणीच्या नावाने मिळत असेल तर हा पुरस्कार माझ्यासाठी आपलेपण आणि स्नेहाचे प्रतीक आहे. लता दीदीच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार मी लता दीदी आपल्या सर्व देशबांधवांची असल्याने त्यांना समर्पित करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

भारतासह जगभरात आपल्या गायनामुळे नावलौकिक मिळविलेल्या भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ जाहीर झालेला पहिला लता मंगेशकर पुरस्कार मला मिळणे हे माझे भाग्यच समजतो, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार स्वीकाल्यानंतर आपली भावना व्यक्त केल्या.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ जाहीर झालेला पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सन्मानपूर्वक एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, लता दीदी आणि माझी ओळख दिवंगत सुधीर फडके यांनी करून दिली. गेल्या अनेक वर्षात मला लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबीय यांच्याकडून खूप स्नेह मिळाला आहे. गेले अनेक वर्षे मंगेशकर कुटुंबीय माझ्या जीवनाचा हिस्सा बनले असून यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी मला त्यांची विशेष आठवण येईल. संगीताच्या या सामर्थ्याला, या शक्तीला आपण लतादीदींच्या रुपात प्रत्यक्षात पाहू शकलो, याचा माझ्यासह समस्त देशवासीयांना अभिमान वाटतो. आपण कोणताही पुरस्कार स्वीकारायचा नाही असे ठरविले होते पण हा पुरस्कार माझ्या बहिणीच्या नावाने असल्याने हा पुरस्कार मी स्वीकारला असून हा पुरस्कार मी समस्त देशवासीयांना अर्पण करतो.

गेल्या जवळपास 80 वर्षांपासून आपण लता दीदी यांचे गीत ऐकत आहोत. लताजी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’च्या मधूर सादरीकरणाप्रमाणे होत्या, देशातील 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. हिंदी, मराठी किंवा संस्कृत असो किंवा इतर भारतीय भाषा असोत, लताजींचा स्वर प्रत्येक भाषेत मिसळलेला आहे. संस्कृती पासून ते श्रद्धेपर्यंत, पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत लता दिदींच्या सूरांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधण्याचे काम केले. जगभरात देखील, त्या भारताच्या सांस्कृतिक राजदूत होत्या असेही पीएम नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

जे अव्यक्ताला व्यक्त करतात- ते शब्द असतात!  जे व्यक्तामध्ये ऊर्जेचा, चेतनेचा संचार करतो- तो नाद असतो. आणि जे चैतन्याला भाव आणि भावनांनी भरून टाकतं, त्याला सृष्टी आणि संवेदनेच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचवतं ते संगीत असतं. संगीतातून आपल्याला मातृत्व आणि ममतेची अनुभूती मिळते. खरे तर संगीत आपल्याला देशभक्ती आणि कर्तव्याच्या जाणीवेच्या शिखरावर नेऊ शकते. लता दीदींच्या गाण्यातून आणि संगीतातून आपल्या सगळ्यांना हीच अनुभूती गेल्या 80 वर्षांपासून मिळत आहे, आणि हेच आपले भाग्य असल्याचे पीएम नरेंद्र मोदी म्हणाले.