प्रयागराज – उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील नवाबगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील खागलपूर गावामध्ये काल रात्री हे निर्घृण हत्याकांड घडले आहे. येथे राहुल तिवारी, त्यांची पत्नी प्रिती आणि तीन मुलींची हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडांचे नेमकं कारण समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार कौशांबी येथील हे कुटुंब नवाबगंज येथील खागलपूर गावामध्ये भाड्याच्या घरात राहत होते. हत्येची माहिती मिळाल्यावर नवाबगंज ठाणे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत. फॉरेन्सिक एक्स्पर्ट्स आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्री घडली आहे. सकाळी घराचा दरवाजा बंद होता. बराच वेळ घरातून काही हालचाल दिसत नसल्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी दरवाजा ठोठावून पाहिला. मात्र दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला असता राहुल यांचा मृतदेह हा लटकलेल्या अवस्थेत आढळला. तर राहुल यांची पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह बेडवर पडले होते. त्यांचा गळा कापून हत्या करण्यात आली होती.