मुंबई – दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. हे असेच सुरू राहिल्यास आणि समुद्राचे तापमान वाढत राहिले तर मुंबईवर चक्रीवादळाचे संकट गडद होणार आहे, असं अहवालातून समोर आलं आहे. मुंबईच्या समुद्राच्या पाण्याची पातळी जर अशीच वाढत राहिली तर २०५० पर्यंत या पातळीत झालेल्या वाढीमुळे सुमारे पाच हजार कोटी एवढे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशी भीती इंटरगर्व्हन्मेटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या सहाव्या मूल्यांकन अहवालाच्या दुसऱ्या भागामध्ये व्यक्त करण्यात आली. २०७० पर्यंत यात २.९ पटीने वाढ होण्याची शक्यता आहे, अशी भीती वर्तविण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पामध्ये पुराचा धोका कमी करणे आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढण्यापासून संरक्षण करण्याकडे लक्ष दिले जात असते. असे असले तरी भरती ओहोटी क्षेत्रातील प्राणी, वनस्पती आणि मासेमारीला मोठा धोका पोहचू शकतो. तर दुसरीकडे मुंबईलगत जागतिक तापमानवाढीसह समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या चक्रीवादळांमध्ये वाढ होईल, अशीही भीती वर्तविण्यात आली आहे.
भविष्यात मुंबईला चक्रीवादळाचे परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवणार आहेत. मान्सूनपूर्व आणि नंतर दोन्ही चक्रीवादळामध्ये वाढ होईल. मुंबई, कोलकाता, चेन्नई या शहरांना वाढत्या समुद्रपातळीचा मोठा धोका आहे.