नाशिकमध्ये खळबळ! बंद गाळ्यात मिळाले आठ मानवी कान, मेंदू, डोळे

WhatsApp Group

नाशिक – मुंबई नाका पोलीस ठाण्यामागे असलेल्या हरिविहार सोसायटीमधील २० आणि २१ क्रमांकांचे दोन गाळे आहेत. हे गाळे गेल्या काही वर्षांपासून बंद होते. यांपैकी एका गाळ्यातून विचित्र प्रकारची दुर्गंधी नागरिकांना मागील दोन दिवसांपासून येत होती.

त्यामुळे दुर्गंधी कोठून येते याचा तेथील रहिवासी शोध घेत होते. रविवारी गाळ्याच्या शटरचा पत्रा एका बाजूने तुटलेला दिसला. तेथून दुर्गंधी सुटत असल्याचं लक्षात येताचं नागरिकांनी पोलिसांचा ‘डायल ११२’ क्रमांक फिरवून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी दाखल झाला.

पोलिसांकडून गाळा उघडला असता त्यात सर्व भंगार माल साठवून ठेवलेला आढळला. यामध्ये लाकडी साहित्यापासून ते विविध लोखंडी वस्तू होत्या. या भंगारामध्ये प्लास्टिकचे दोन डबे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असल्याचा पोलिसांना संशय आल्यामुळे ते डबे जेव्हा पोलिसांनी उघडले तेव्हा दुर्गंधीचा एकच लोट पसरला.

पोलिसांनी नाकातोंडाला मास्क लावत बॅटरीच्या साहाय्याने पाहणी केली असता द्रव रसायनामध्ये मानवी अवयव जतन करून ठेवण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. फॉरेन्सिक चमूने हे दोन्ही डबे ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी गाळामालक महिला शुभांगिनी शिंदे यांच्याशी संपर्क साधला. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांना जे डॉक्टर आहेत, त्यांनाही पोलिसांनी या ठिकाणी बोलावून माहिती जाणून घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत त्यांची पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू होती.

मानवी अवयव ज्या पद्धतीने जतन करून ठेवले गेले ती पद्धत वैद्यकशास्त्राशी निगडित वाटत आहे. अवयवांची कापणीदेखील अत्यंत शार्प असून आठ कान डब्यातून मिळाले आहेत. वेगवेगळ्या बॉटलमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी डोळे, हात, कान असे वेगवेगळे मानवी अवयव ठेवण्यात आले आहेत. तसेच मेंदूसदृश काही अवयवही यात मिळाले. गाळा ज्यांचा आहे, ते दोन्ही भाऊ डाॅक्टर असून त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली जात आहे. त्यांच्या या गाळ्यात मागील इतक्या वर्षांपासून मानवाचे हे अवयव कसे आले व कुठून आणले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.