टॉवरला भीषण आग, होरपळून 14 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

झारखंडमधील धनबाद येथील आशीर्वाद टॉवरला भीषण आग लागली. या घटनेमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी धनबादच्या डीएसपी कायदा आणि सुव्यवस्था यांचे वक्तव्यही समोर आले आहे. ते म्हणाले की, धनबादमधील एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. अनेकजण अडकल्याची भीती आहे. काही मृत्यूची नोंद झाली आहे. बचावकार्य सुरू असल्याने नेमका आकडा तपासता आला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बचाव पथकाचे लोक बचाव कार्यात गुंतले आहेत. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक पीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 50 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात आहेत. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी धनबादमधील आशीर्वाद टॉवर अपार्टमेंटला लागलेल्या आगीत झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार केले जात आहेत.”

धनबादचे एसएसपी संजीव कुमार म्हणाले, ‘धनबादमधील एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. अपार्टमेंटमध्ये लग्न समारंभासाठी अनेक लोक उपस्थित होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आम्ही बचावावर भर देत आहोत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.