IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 सामन्यांमध्ये रोहित शर्माची कामगिरी कशी? येथे पाहा संपूर्ण आकडेवारी

WhatsApp Group

India vs Australia T20I Series: भारताविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत (Australia Tour Of India) दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेला येत्या 20 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध भारताला पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावे लागेल. आगामी T20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कर्णधार रोहित शर्माची या मालिकेतील कामगिरी खूप महत्त्वाची असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे आकडे कसे आहेत ते जाणून घेऊया.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाविरुद्धच्या T20 मध्ये रोहितने आतापर्यंत 19 सामन्यांच्या 16 डावांमध्ये 22.71 च्या सरासरीने 318 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतकेही झळकली आहेत. रोहितला आतापर्यंत कांगारूंविरुद्ध T20मध्ये शतक झळकावता आलेले नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 25 चौकार आणि 15 षटकार मारले आहेत. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फने रोहितला सर्वाधिक वेळा बाद केले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर रोहितची आकडेवारी

रोहितने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण नऊ T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 25.85 च्या सरासरीने आणि 131.15 च्या स्ट्राईक रेटने एकूण 181 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा सर्वाधिक स्कोर 60 आहे. रोहितने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 16 चौकार आणि सहा षटकारही मारले आहेत. रोहितने 2019 पासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही T20 सामना खेळलेला नाही.

रोहित शर्मा (3,620 धावा) आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्यापाठोपाठ भारताचा विराट कोहली (3,584धावा), न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल (3,497 धावा) आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग (3,011 धावा) यांचा क्रमांक लागतो. – समीर आमुणेकर