नाशिक-दिंडोरी मार्गावर बोलेरो-दुचाकीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

नाशिक : नाशिकमध्ये सातत्याने अपघात होत आहेत. नाशिक-दिंडौरी मार्गावर शुक्रवारी दुपारच्या सुमारास बोलेरो जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार दोन आणि बोलेरोमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास नाशिक-दिंडोरी महामार्गावरील ढकांबे  गावाजवळ बोलेरो कार आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. बोलेरोचा टायर फुटल्याने अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन दुचाकीला धडकले. यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली.

अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी आणि बोलेरोचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने गंभीर जखमी तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अन्य 5 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.