Asia Cup 2022 : हाँगकाँग आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र, 31 ऑगस्ट रोजी भारताशी भिडणार

WhatsApp Group

27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आशिया चषकासाठी पात्र ठरणारा हाँगकाँग हा सहावा संघ ठरला आहे. भारत आणि पाकिस्तानसह हाँगकाँगला अ गटात स्थान मिळाले आहे. 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँगची भारताशी लढत होणार आहे.

बुधवारी झालेल्या सामन्यात हाँगकाँगने आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या यूएईचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह हाँगकाँगचे आशिया कपमधील स्थान निश्चित झाले. हाँगकाँगचा संघ चौथ्यांदा आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे. यापूर्वी हाँगकाँगने 2004, 2008 आणि 2018 मध्ये आशिया चषकात प्रवेश केला होता. मात्र, टी-20 फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच हाँगकाँगचा संघ आशिया चषक स्पर्धेत सहभागी होणार आहे.

हाँगकाँग पात्र ठरल्याने 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेतील दोन्ही गटांचे चित्र स्पष्ट झाले आहे. भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग अ गटात आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश ब गटात आहेत. आयसीसी क्रमवारीत हाँगकाँग सध्या 23व्या क्रमांकावर आहे. असे असतानाही हाँगकाँगने सलग तीन सामने जिंकून आशिया चषकासाठी पात्रता मिळवण्यात यश मिळवले आहे.

सिंगापूरशिवाय हाँगकाँग संघाने क्वालिफायर फेरीत कुवेत आणि यूएईचा पराभव केला आहे. हाँगकाँग संघाने पात्रता फेरीच्या गुणतालिकेत तीन विजयांसह पहिले स्थान मिळविले. कुवेत संघ चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. दुसरीकडे, यूएई संघाने केवळ एकच सामना जिंकला. याशिवाय सिंगापूर संघ क्वालिफायर फेरीत एकही सामना जिंकू शकला नाही.

आशिया कपमध्ये टीम इंडियाची मोहीम 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारताची टक्कर पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर 31 ऑगस्टला भारताची हाँगकाँगशी टक्कर होणार आहे. अ गटातील पहिल्या दोन स्थानांना पुढील फेरीत स्थान मिळेल.