अशा जन्मल्या ‘अ‍ॅशेस’

WhatsApp Group

“हे केलं जाऊ शकतं” (“This can be done”)

ऑस्ट्रेलियाच्या धडाडणाऱ्या वेगवान गोलंदाज फ्रेड स्पॉप्पोर्थ यांच्या या वाक्याने क्रिकेटचा इतिहास घडला. अजूनही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू अगदी इतर मालिका सोडा, पण विश्वचषकापेक्षा सुद्धा कशाला जास्त महत्त्व देत असतील तर ते अ‍ॅशेसच्या कसोटी मालिकेला. सन १८८२ पासून या दोन देशात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेला अ‍ॅशेस मालिकांमध्ये गणले जाते. १३९ वर्षांपूर्वी असे नेमके काय घडले होते. की ज्याची धग आजपर्यंत जिवंत आहे? चला पाहू.

२८ ऑगस्ट १८८२, ओव्हलचे मैदान, लंडन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडच्या भूमीवरील दुसरा कसोटी सामना. दोन वर्षांपूर्वी खेळलेल्या पहिल्या सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली होती. अर्थात जगातली सुपरपॉवर असणाऱ्या इंग्लंड संघाला त्यांच्याच देशात येऊन कोणी हरवू शकेल हे ब्रिटिश जनतेच्या मनात सुद्धा नव्हते. सामन्याची सुरुवात त्यांच्या वर्चस्वाला साजेशी अशी झाली.

बिली मरडॉक या ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाची धूळधाण उडवत इंग्लिश गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त ६३ धावांमध्ये गुंडाळला. त्याकाळी केवळ चार चेंडूंचे ‘षटक’ टाकले जाई. आजच्या भाषेत सांगायचे तर ऑस्ट्रेलियन संघाने ५३.२ इतकीच षटके खेळून काढली.

इंग्लंडच्या फलंदाजीची सुरुवात सुद्धा निराशाजनक होती. क्रिकेटचे पितामह समजले जाणारे डब्लू जी ग्रेस केवळ ४ धावांवर बाद झाले. इतर फलंदाज सुद्धा टिकाव धरू शकले नाही आणि फलंदाजीसाठी कठीण असणाऱ्या अशा खेळपट्टीवर दिवसाअखेरीस इंग्लंडचा डाव १०१ धावांवर संपुष्टात आला.

इंग्लंडच्या वाताहतीमध्ये सर्वात मोठा हात होता तो फ्रेड स्पॉप्पोर्थचा. द डेमन म्हणजेच राक्षस या नावाने प्रसिद्ध असलेल्या स्पॉप्पोर्थ हा त्याकाळचा खऱ्या अर्थाने वेगवान गोलंदाज. ग्रेस सकट त्याने इतर सहा इंग्रज फलंदाजांना माघारी धाडले होते. अर्थात इंग्लंडकडे तरीही पहिल्या दिवसाअखेरीस ३८ धावांची बढत होती आणि खेळपट्टीची परिस्थिती पाहता ती फार महत्वाची होती.

२९ ऑगस्ट १८८२

दुसऱ्या दिवशी ओव्हलचे मैदान दर्शकांनी फुलून गेले होते आणि जे हजर होते त्यांनी इतिहास घडताना पहिला. ऑस्ट्रेलियन सलामी फलंदाज हयुग मॅस्सी याने आक्रमक पवित्रा घेत ६० चेंडूंमध्ये ५५ धावा ठोकल्या. ज्या खेळपट्टीवर अक्खा ऑस्ट्रेलियन संघ ६५ धावांवर बाद झाला होता त्याच खेळपट्टीवर मॅस्सीने आपल्या बॅटीचा दांडपट्टा चालवित इंग्रज गोलंदाजांना हतप्रभ केले.मॅस्सी बाद झाल्यानंतर मात्र खेळपट्टीने पुन्हा एकदा आपले राक्षसी रूप दाखवले. ऑस्ट्रेलियन संघ ६६/० वरून ७९/५ असा गडगडला. कर्णधार बिली मरडॉकच्या २९ धावांमुळे ऑस्ट्रेलियन संघाने कशाबशा १२२ धावा गाठल्या.

या ऑस्ट्रेलियन डावामध्ये एक विवादास्पद किस्सा घडला. ऑस्ट्रेलियाचा एक नवखा खेळाडू सॅमी जोन्स हा त्याची धाव पूर्ण करून अनवधानाने क्रिजबाहेर आला होता. ग्रेस यांनी अचूक संधी हेरून त्याला धावबाद केले. खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध असलेली ही गोष्ट ऑस्ट्रेलियन संघाला रुचली नाही आणि त्याचा खास राग आला तो पोहोचला स्पॉप्पोर्थला.

इंग्लंड संघासमोर चौथ्या डावात जिंकण्यासाठी लक्ष होते फक्त ८५ धावांचे मात्र इकडे ड्रेसिंग रूम मध्ये स्पॉप्पोर्थ रागाने धगधगत होता. त्याच्यात आत्मविश्वास होता कि आपण या इंग्लंड संघाला नमवून दाखवू आणि तो त्याच्या सहकाऱ्यांना फक्त एकच वाक्य बोलला, “हे केले जाऊ शकते.”
इंग्लंडने धावांचा पाठलाग सुरू केला आणि स्पॉप्पोर्थने आपल्या शब्दाला जागत तुफान मारा केला. ३२ धावा केल्यानंतर ग्रेस यांना हॅरी बॉईलने बाद केले तेव्हा इंग्लंड संघ ५४/४ अशा स्थितीत होता. आता गरज होती फक्त ३१ धावांची आणि आपले सहकारी इतक्या धावा करतील असा दृढ विश्वास ग्रेस यांच्या मनात होता. मात्र स्पॉप्पोर्थ याचे मत काहीसे वेगळे होते.

५४/४ वरून ६६/५, ७०/६, ७०/७, ७५/८ आणि ७५/९ अशी इंग्लंडची दाणादाण उडाली. या पडलेल्या पाच बळी पैकी चार होते स्पॉप्पोर्थचे. शेवटची जोडी मैदानावर असताना इंग्लंडला विजयासाठी हव्या होत्या केवळ दहा धावा. मैदानावर प्रचंड तणावाचे वातावरण होते. असे म्हणतात की एका प्रेक्षकाला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला. तर असेही सांगितले जाते की एक प्रेक्षक हा सामना पाहण्यामध्ये इतका गुंग होता की त्यांने आपल्या छत्रीचा दांडा चावून काढला.

जी गोष्ट इंग्लंडच्या फलंदाजांना जमली नाही ती इंग्लंडच्या गोलंदाजांना करून दाखवणे शक्यच नव्हते. बॉयलने टेड पीटचा त्रिफळा उडवत इंग्लंडला ७७ धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाने अभूतपूर्व असा सात धावांनी विजय मिळवला. मैदानावर असलेला प्रत्येक इंग्लिश दर्शक सुन्न पडला होता. स्वतःच्या मायभूमीवर पराभव पचवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ. ज्या देशाने अख्ख्या जगावर राज्य केले त्यांचा आज स्वतःच्याच मातीत स्वतःच्याच खेळामध्ये पराभव झाला होता आणि त्यात सिंहाचा वाटा होता तो फ्रेड स्पॉप्पोर्थचा. त्याने पहिल्या डावात ७ बळी आणि दुसऱ्या डावात ७ बळी असे एकूण ९० धावा देत १४ बळी घेतले.

अर्थातच हा पराभव इंग्लंडच्या जिव्हारी लागला. द स्पोर्टिंग टाईम्स या साप्ताहिक वर्तमानपत्रात इंग्लंड क्रिकेटच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. मजकूर होता, “२९ ऑगस्ट १८८२ रोजी इंग्लिश क्रिकेटचा द ओव्हल येथे मृत्यू झाला. याचे आम्हा सर्वांना प्रचंड दुःख आहे.” आणि पुढे लिहिले होते, “यांचे दहन करून त्याची राख ऑस्ट्रेलियाला नेली जाईल.” ही राख म्हणजेच द मॅस्सी. हीच मालिका १८८२ ते आजपर्यंत अव्याहत चालू आहे.