
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा, गोंदिया, आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोली पर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादन प्रक्रिया आणि इतर बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
चालू आर्थिक वर्षाच्या नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आणि नियोजन विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर, तातडीने करण्यात येईल. रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी प्रस्तावित केली आहे. पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग केले आहेत. रांजनोली- मानकोली उड्डाणपुलावरील काही भागातील खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला आहे. दर्जेदार कामासाठी रेडीमिक्स वापरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.