हर्षल पटेलनं रियान परागशी हात मिळवण्यासही दिला नकार, सामन्यात जोरदार राडा: पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. चुरशीच्या लढतीमध्ये राजस्थानने बंगळुरूला नमवलं. पण यावेळी मैदानामध्ये एक जोरदार राडा पाहायला मिळाला. राजस्थानचा अष्टपैलू रियान पराग आणि आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल थेट एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

सामन्याच्या पडिल्या डावात २०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रियान परागने षटकार खेचला आणि संघाला १४४ धावांपर्यंतची मजल मारुन दिली. त्यानंतर पॅव्हेलियनकडे परतत असताना हर्षल पटेल आणि रियान पराग यांच्यात वाद रंगला. या वादाचे पडसाद सामना संपल्यानंतरही पाहायला मिळाले.

रियान परागने या सामन्यामध्ये एकाकी झूंज देताना २९ चेंडूंत अर्धशतक ठोकलं. परागने ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५६ धावा केल्या. त्याने हर्षल पटेलनं टाकलेल्या २०व्या षटकात १८ धावा चोपल्या. अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून पेव्हेलियनच्या दिशेने जाणाऱ्या रियानकडे पाहून हर्षल काहीतरी त्याला बडबडला. त्यानंतर रियान जाब विचारण्यासाठी माघारी फिरला. दोघांमध्ये वाद वाढणार हे लक्षात येताच राजस्थानच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्याने हर्षलला रोखलं.

राजस्थानच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यात मारा करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला अवघ्या ११५ धावांवर गारद करत मोठा विजय मिळवला. सामना संपल्यानंतर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याची पद्धत असते. पण सामन्यामध्ये हर्षल पटेल आणि रियान पराग यांच्यात झालेल्या राड्याचे पडसाद इथेही पाहायला मिळाले. हर्षल पटेलने राजस्थानच्या सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केलं. पण यावेळी रियान परागशी हस्तांदोलन करण्यास त्याने नकार दिला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाला आहे.