आसाममध्ये अतिवृष्टीनंतर पुराचा कहर, IMDकडून रेड अलर्ट

WhatsApp Group

एकीकडे देशात उष्णतेने थैमान घातले आहे तर दुसरीकडे आसाममध्ये पुरामुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक भाग अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झाले आहेत. आसामच्या बराक व्हॅली आणि दिमा हासाओ जिल्ह्यासह शेजारच्या त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूरच्या काही भागांशी रस्ते आणि रेल्वे संपर्क मंगळवारी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे विस्कळीत झाला आहे.

आसाम आणि मेघालयमध्ये अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे रुळ वाहून गेले आहेत. मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनात किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे यंदा ईशान्येकडील राज्य पुराच्या विळख्यात आहे. पुरामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही हळूहळू वाढ होत आहे.

मोठ्या प्रमाणावर भूस्खलन आणि पाणी साचल्यामुळे राज्यातील डोंगराळ भागात रेल्वे ट्रॅक, पूल आणि रस्ते दळणवळणाचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयच्या अनेक भागांतील लोकांना समस्या निर्माण झाल्या आहेत.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील तीन दिवस या पभागांत अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच हवामान खात्याने बुधवारी आसाममध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.